महाराष्ट्र
Trending

गडचिरोलीत भीषण अपघात: पहाटे फिरायला गेलेल्या चार शालेय मुलांचा मृत्यू

Three schoolstudents killed three injured in tragic hit and run near Gadchiroli : अज्ञात ट्रकने दिली धडक, तिघे गंभीर जखमी; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मदतीची घोषणा

गडचिरोली :- शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या काटली गावाजवळ आज पहाटे एक भीषण अपघात घडला. फिरायला गेलेल्या सहा शालेय मुलांना भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात ट्रकने धडक दिली. या अपघातात चार मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये टिंकू नामदेव भोयर (14 वय), तन्मय बालाजी मानकर (16 वय), दुषण दुर्योधन मेश्राम (14 वय) आणि तुषार राजेंद्र मारभते (14 वय) या चौघांचा समावेश आहे. सर्व मुले काटली गावातील रहिवासी आहेत. अपघातानंतर ट्रकचालक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे ही मुले पहाटे फिरायला गेली होती आणि गडचिरोली-आरमोरी मार्गावरील नाल्याजवळ बसली होती. पहाटे 5 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास एका भरधाव ट्रकने त्यांना उडवले. यात टिंकू आणि तन्मय यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुषणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या क्षितिज तुळशीदास मेश्राम आणि आदित्य धनंजय कोहपरे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने नागपूरला पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

या अपघातामुळे नागरिकांनी भरधाव अवजड वाहतुकीवर संताप व्यक्त केला आहे. गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपी ट्रकचालकाचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0