क्राईम न्यूज

ॲक्सिस बँकेतील बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश: गडहिंग्लज पोलिसांची थेट बांगलादेश सीमेपर्यंत धडक!

Fake Currency Racket Busted : पश्चिम बंगालमधून दोघांना अटक; बनावट नोटांची निर्मिती बांगलादेशात, वितरण महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशापर्यंत

Fake Currency News : कोल्हापूरच्या गडहिंग्लज पोलिसांनी ‘अ‍ॅक्सिस बँके’च्या एटीएममध्ये बनावट नोटा भरून फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी थेट बांगलादेश सीमेपर्यंत या रॅकेटचा छडा लावत दोन मुख्य संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले मलिक अफसरअली शेख (32 वय) आणि टोनी जहरुद्दीन शेख (23 वय) हे दोघेही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

या प्रकरणाचा उलगडा 17 जून रोजी गडहिंग्लजमध्ये आकाश रवींद्र रिंगणे या तरुणाने एटीएममध्ये 500 रुपयांच्या 35 बनावट नोटा भरल्याच्या घटनेनंतर झाला. पोलिसांनी आकाशच्या अटकेनंतर तपास सुरू केला आणि धागेदोरे पकडत एकापाठोपाठ एक 10 जणांची साखळी शोधून काढली. या साखळीत नितीन कुंभार, अशोक कुंभार, दिलीप पाटील, सतीश कणकणवाडी, भरमू कुंभार आणि अक्षय कुंभार यांचा समावेश आहे. यातील मुख्य सूत्रधार अशोक कुंभारची ओळख तुरुंगात असताना टोनीच्या वडिलांशी झाली आणि त्यातूनच बनावट नोटांची तस्करी सुरू झाल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बनावट नोटांची छपाई बांगलादेशात होते. त्यानंतर त्या नोटा सीमेवरून पार्सल स्वरूपात भारतात फेकल्या जातात आणि भारतीय हस्तक त्यांना उचलून देशांतर्गत वितरित करतात. विशेष म्हणजे, या बनावट नोटांची खेप थेट बेंगळुरूपर्यंत पोहोचवली जात होती. या रॅकेटमध्ये ओडिशाचा तापसकुमार प्रधान देखील सामील असल्याने, या संपूर्ण जाळ्याची पाळेमुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांपर्यंत पसरली आहेत. यामुळे पोलिसांना तिन्ही राज्यांमध्ये जाऊन आरोपींना पकडावे लागले.

या बनावट नोटांमागील आर्थिक गणितंही धक्कादायक आहेत. 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा बाजारात उतरवल्यास आरोपींना 60 हजार रुपये मोबदला मिळत असे. यापैकी 40 हजार रुपये बनावट नोटा पुरवणाऱ्याला पाठवले जात आणि 20 हजार रुपये हस्तकांकडे राहत असत. बहुतांश व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जात होते. तपासात 10 संशयितांकडून 16.88 लाख रुपयांचा ऑनलाइन व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून पोलिसांनी सुमारे 35 लाख रुपयांच्या बनावट नोटा या गटाने चलनात आणल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी 4 आरोपींचा शोध सुरू आहे. हे चारही आरोपी सापडल्यानंतर संपूर्ण रॅकेटचा शेवटचा टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक रमेश मोरे, तसेच कर्मचारी रामदास किल्लेदार, दादू खोत, अरुण पाटील, युवराज पाटील आणि प्रशांत शेवाळे यांच्या पथकाने या मोठ्या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago