मुंबईठाणे
Trending

Tejashvi Ghosalkar : ठाकरे गटाला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का! – माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Tejashvi Ghosalkar Joined BJP : “विकासासाठी भाजपमध्ये आले”; दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा निर्णय; भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केले स्वागत

मुंबई :- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला उत्तर मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर Abhishek Ghosalkar यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज दादर येथील ‘वसंत स्मृती’ कार्यालयात भाजपमध्ये (BJP) जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश सोहळा सकाळी 10 वाजता भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.तेजस्वी घोसाळकर या कट्टर शिवसैनिक कुटुंबातील सदस्य आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई असल्याने त्यांचा हा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपने केले स्वागत

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी तेजस्वी घोसाळकर यांचे पक्षात स्वागत करताना म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासामुळे प्रभावित होऊन, तसेच मुंबईची सुरक्षा, विकास आणि हिंदुत्व या रस्त्यावर राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय तेजस्वी घोसाळकर यांनी घेतला आहे. मुंबईचा विकास घडवण्यासाठी आणि महानगरपालिकेवर हिंदुत्वाचाच भगवा फडकवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.”

तेजस्वी घोसाळकर यांचे स्पष्टीकरण

यावेळी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय कठीण असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “2017 मध्ये मी शिवसेनेकडून नगरसेविका म्हणून निवडून आले होते. शिवसेना पक्ष सोडताना खूप दुःख होत आहे, अनेक गोष्टी आहेत, त्या मी बोलू शकत नाही. पण माझ्या प्रभागात विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माझी सगळी कामे पूर्ण होतील, अशी मला अपेक्षा आहे.”
तेजस्वी घोसाळकर या गेल्या वर्षी गोळीबारात निधन झालेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. वार्ड क्रमांक 1 ओबीसी राखीव झाल्याने त्या निवडणूक लढवणार नाहीत असे बोलले जात होते, तरीही त्यांचा भाजपमधील प्रवेश उत्तर मुंबईतील राजकारणाची समीकरणे बदलणारा ठरू शकतो.

पक्षप्रवेशापूर्वी शिवसैनिकांना भावनिक पत्र

प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू-भगिनींनो,

आज आपल्याशी संवाद साधताना माझे मन प्रचंड उद्विग्न झाले आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती.

आज मन जड आहे… शब्द अपुरे पडत आहेत… पण तरीही हा संवाद आवश्यक आहे.

मी, तेजस्वी अभिषेक घोसाळकर,

एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते; सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले. लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा

आनंद मिळत गेला.

सगळं काही छान सुरू असताना, अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर-बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्नं पाहत होतो.

पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं…

एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला.

अभिषेकची निघृण हत्या झाली.

शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली.

त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं.

दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात.

तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे.

पण आजची परिस्थिती वेगळी आहे.

आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे.

मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत.

परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक १ असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे

पाहावे लागत आहे.

तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते,

माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही.

मी कायम तुमच्या ऋणात राहीन.

जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत

राहीन.

आजही मी तुम्हाला शब्द देते-

जात-धर्म-पक्ष-विचार न पाहता, जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल, तेव्हा कोणताही विचार न

करता मी धावून येईन.

अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे, समाजासाठी प्रामाणिकपणे काम

करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे.

आज आपणच माझा परिवार आहात.

म्हणून बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल, अशी माझी

मनापासून अपेक्षा आहे.

आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा

जाऊ देणार नाही.

आपले प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो, हीच प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0