मुंबई

Suraj Chavan On Sunil Tatkare : हकालपट्टी झालेले सुरज चव्हाण थेट प्रदेश सरचिटणीसपदी; छावा संघटनेचा सुनील तटकरेंना इशारा

•सुरज चव्हाण यांना मारहाणी बदल्यात पदोन्नती विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीकास्त्र

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी ज्या सूरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्याच चव्हाण यांना अवघ्या महिन्याभरातच पुन्हा पक्षात घेऊन थेट प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पक्षात अंतर्गत धुसफुस सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

काही काळापूर्वी लातूर येथे एका कार्यक्रमात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी संतप्त झालेल्या सूरज चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर अजित पवार यांनी कठोर भूमिका घेत चव्हाण यांना युवक प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकले होते.

आता चव्हाण यांच्या राजकीय पुनर्वसनामुळे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर थेट टीका करताना म्हटले आहे की, “अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही. मारहाण करणाऱ्याला पक्षात स्थान नाही, असे अजितदादांनी म्हटले होते. मग त्यांच्या भूमिकेला डावलून तटकरे यांनी चव्हाण यांचे पुनर्वसन केले आहे का?” असा सवाल घाडगे यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर, “येणाऱ्या काळात सुनील तटकरे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” असा संतप्त इशाराही विजय घाडगे यांनी दिला आहे. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

vivek

Recent Posts