Eknath Shinde : महायुतीत मिठाचा खडा पडता कामा नये; धंगेकरांना निरोप पाठवला आहे” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde On Ravindra Dhangekar : जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करणाऱ्या रवींद्र धंगेकरांवर होणार कारवाई? दिल्लीत सूचक वक्तव्य
ANI,दिल्ली :- पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका करणारे शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर आता पक्षाकडून कारवाई होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (25 ऑक्टोबर) दिल्लीत सूचक आणि अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शिंदे यांचे सूचक विधान
रवींद्र धंगेकर यांच्याकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांविषयी विचारणा झाल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,”कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये. मी रवींद्र धंगेकर यांना काय पाठवायचा तो निरोप पाठवला आहे.” “महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नयेत. महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.””मी पुण्यात गेलो होतो तेव्हाही भाष्य केलं होतं, आजही करतो आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे. महायुतीमध्ये कुठे बेबनाव होईल, असे कृत्य किंवा वक्तव्य करू नये.”
कारवाईबद्दल थेट उत्तर नाही
‘तुम्ही रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करणार का?’ या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, “रवींद्र धंगेकर यांच्याकडे पक्षाचा काय तो निरोप जायचा होता तो गेला आहे. धंगेकरांचं वक्तव्य जे आहे, त्याबाबत मी त्यांच्याशी बोलेन. ते मला भेटतीलही.”
पंतप्रधान मोदींशी विकासकामांवर चर्चा
दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना संत तुकारामांची मूर्ती भेट दिली.राज्यात सुरू असलेल्या विकास कामांबाबत आणि काही प्रकल्पांवर चर्चा झाली.मोदीजींनी महायुतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचं कौतूक केलं आणि असंच काम पुढे सुरू ठेवण्याची सूचना केली.मुंबईत पॉड टॅक्सी सुरू करण्याबाबत पंतप्रधान मोदी आग्रही आहेत, या प्रकल्पाला चालना देण्याबाबत चर्चा झाली.
महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाबाबत मोदीजींनी आस्थेने चौकशी केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोदीजींनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.


