Eknath Shinde : पहिले ‘कार्यक्रम रद्द’ म्हणणारे सांबरे रात्री मात्र एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीतच शिवसेनेत दाखल!

Eknath Shinde Latest News : जिजाऊ संघटनेचे प्रमुख निलेश सांबरे यांचा ‘गुप्त’ पक्षप्रवेश चर्चेत; राजकीय भूमिकेवर नवे प्रश्नचिन्ह
ठाणे | गुरुवारी (12 जून) दिवशी अहमदाबाद येथे घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर, आपला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम स्थगित करत असल्याची माहिती जिजाऊ संघटनेचे प्रमुख निलेश सांबरे यांनी समाजमाध्यमांद्वारे जाहीर केली. मात्र, रात्रीच ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी गुप्तपणे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या या विरोधाभासी भूमिकेवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दिवसभर ‘कार्यक्रम रद्द’ असल्याचे सांगूनही जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते सायंकाळी ठाण्यातील कियारा बॅन्क्वेट हॉल येथे हजर राहिले होते. याच ठिकाणी माध्यमांविना पार पडलेल्या कार्यक्रमात निलेश सांबरे यांनी शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश जाहीर नव्हता, त्यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सामाजिक कार्यकर्ते की रणनीतीकार नेते?
कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यांत आपली मजबूत पकड असलेले निलेश सांबरे हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नाहीत, तर एक कुशल राजकीय रणनीतीकार म्हणूनही ओळखले जातात. आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्यातून त्यांनी जिजाऊ संघटनेला ग्रामीण भागात एक बळकट ओळख मिळवून दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत त्यांनी तब्बल 2.31 लाख मते मिळवली होती. त्यांच्या या मतेकाठीमुळेच भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला होता. वंचित बहुजन आघाडीचा आधार घेऊन लढलेल्या सांबरे यांनी कुणबी समाजातील मोठा जनाधार मिळवण्यात यश मिळवले होते.


