Eknath Shinde : शिंदेंचे ‘ताज’मधून विकासाचे रणशिंग! ठाकरेंनी स्वतःचे घर सांभाळावे; मुंबईच्या सत्तेसाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी

• नव्या नगरसेवकांना शिंदेंचा ‘कानमंत्र’, तर भाजप-ठाकरे गटात हातमिळवणीच्या हालचाली? मुंबईच्या राजकारणात सस्पेन्स वाढला
मुंबई l मुंबईच्या राजकारणात सध्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’चा धुरळा उडाला असून वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये आपल्या नगरसेवकांची मोट बांधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “शिवसेना हा कुणाला घाबरणारा पक्ष नसून लोक शिवसेनेला घाबरतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आमची चिंता करण्यापेक्षा स्वतःचे नगरसेवक सांभाळावेत,” असा थेट टोला शिंदेंनी लगावला. नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधताना त्यांनी भावनिक मुद्द्यांपेक्षा प्रभागातील रस्ते, पाणी आणि मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. मुंबईकरांनी विकासाला पसंती दिली असून आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



मात्र, या सत्तासंघर्षात आता धक्कादायक वळणे पाहायला मिळत आहेत. शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. याला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला महापौरपद किंवा स्थायी समितीसारखी महत्त्वाची पदे देण्यास विरोध दर्शवत पक्षश्रेष्ठींकडे आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. भाजप आणि ठाकरे गट यांच्यात पडद्यामागे सुरू असलेल्या या गुफ्तगूमुळे शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता असून, आगामी आठवडा मुंबईच्या सत्तेचा नवा चेहरा ठरवणारा असेल.


