
Eknath Shinde on Rahul Gandhi : ईव्हीएम काँग्रेसच्याच काळात आले, मग आता स्वतःच्याच सरकारवर संशय? शिंदे यांचा पलटवार
मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी पुन्हा एकदा केलेल्या मतचोरीच्या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणूक आयोगाने पुरावे सादर करण्यास सांगितले असतानाही ते केवळ आरोप करत असल्याची टीका शिंदे यांनी केली. जर काँग्रेस जिंकते तेव्हा ते ईव्हीएमवर संशय घेत नाहीत, पण हरतात तेव्हाच आरोप करतात, असेही त्यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची मते वगळण्यात आल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “निवडणूक आयोगाने राहुल गांधी व इतर लोकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. पण ते न करता ते केवळ आरोप करण्याचे काम करत आहेत.” कर्नाटकच्या आलंदमध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला, मग तिथे मतचोरी झाली असती तर ते निवडून आले असते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘ईव्हीएम काँग्रेसच्याच सरकारने आणले’
एकनाथ शिंदे यांनी ईव्हीएमच्या मुद्यावरून काँग्रेसला घेरले. ते म्हणाले, “काँग्रेस फक्त ‘फेक नरेटिव्ह’ पसरवण्याचे काम करते. त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे द्यावेत.” ईव्हीएम मतदान हे काँग्रेसच्याच मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुरू झाले होते, याची आठवण करून देत शिंदे यांनी विचारले, “मग त्यांनी केलेली प्रक्रिया चुकीची आहे असे राहुल गांधी यांना म्हणायचे आहे का?”
‘तुम्हाला विजय मिळतो तेव्हा तुम्ही आरोप करत नाही’
काँग्रेसचा कर्नाटक आणि तेलंगणात विजय झाला, तेव्हा त्यांनी आरोप केले नाहीत, असेही शिंदे म्हणाले. तसेच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जागा मिळाल्या, तेव्हाही ते बोलले नाही, पण विधानसभा निवडणुकीत मतदार सतर्क झाला. आमच्या सरकारने लाडकी बहीण योजनेसारख्या लोकाभिमुख योजना राबवल्या. त्याची पोचपावती म्हणून राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यामुळे पराभव झाल्यावर ते ईव्हीएम, मतदार यादी आणि अगदी कोर्टावरही आरोप करतात, अशी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनाही टोला लगावला. “विरोधकांची महाविकास आघाडी तुटल्याचे चित्र आहे. आता त्यांचे जे काही (ठाकरे बंधूंची युती) सुरू आहे, तेही तुटले वाटते,” असे ते म्हणाले. बेस्टच्या निवडणुकीत मिळालेल्या निकालावरून त्यांनी ठाकरे बंधूंना, “या छोट्याशा निवडणुकीने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली,” असे सांगत चिमटा काढला.


