Eknath Shinde : एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क, सर्वोच्च न्यायालयातील ‘धनुष्यबाणा’वर लक्ष?

•खासदारांच्या प्रश्नांसाठी दिल्लीवारीचे स्पष्टीकरण, मात्र न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर भेट महत्त्वाची
ठाणे :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांची ही भेट राज्यातील खासदारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले असले, तरी या दिल्लीवारीमागे राजकीय आणि न्यायालयीन अशी दोन्ही प्रमुख कारणे असल्याची चर्चा सध्या तीव्र झाली आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याशिवाय, ते पक्षाच्या खासदार आणि काही राज्य प्रमुखांनाही भेटणार आहेत. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान शिंदे आपल्या खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांना आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) प्रमुख नेत्यांना भेटतील, असेही सामंत यांनी नमूद केले आहे.
मात्र, शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचे मुख्य कारण वेगळेच असल्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. येत्या काळात सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्ह आणि नावाबाबत महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे दिल्लीत काही ज्येष्ठ विधीज्ञांची भेट घेऊन कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे समजते. पक्षाच्या भवितव्यासाठी हा न्यायालयीन लढा अत्यंत महत्त्वाचा असल्याने, शिंदे यांची ही दिल्लीवारी केवळ प्रशासकीय स्वरूपाची नसून, ती राजकीय आणि कायदेशीर रणनीतीचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.



