महाराष्ट्र

Eknath Shinde : महायुतीत बिघाडी? वर्षाच्या शेवटच्या कॅबिनेटला एकनाथ शिंदेंची दांडी; 18 महापालिकांत युती फिस्कटल्याने ‘दादा’ नाराज?

•भाजपने झुलवत ठेवल्याचा शिंदे गटाचा आरोप; उदय सामंत यांच्याकडून तब्येतीचे कारण पुढे करत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

मुंबई | मुंबई,पुण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच महायुतीमध्ये मोठे ‘महायुद्ध’ सुरू असल्याचे समोर आले आहे. भाजपसोबतच्या जागावाटपाच्या तिढ्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे नाराज असून, या नाराजीपोटीच त्यांनी आजच्या महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपच्या ‘वेट अँड वॉच’ धोरणामुळे शिंदे सेना घायाळ

राज्यातील 29 महापालिकांपैकी केवळ 11 ठिकाणीच भाजप आणि शिंदे गटाची युती होऊ शकली आहे. उर्वरित 18 ठिकाणी केवळ चर्चेच्या फेऱ्या झाल्या, पण जागावाटपाचा ठोस निर्णय होऊ शकला नाही.

भाजपने अनेक ठिकाणी शिवसेनेच्या प्रस्थापित जागांवर दावा ठोकला आणि शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटप लटकवून ठेवले. यामुळे शिवसेनेच्या अनेक इच्छुकांना ऐनवेळी अपक्ष किंवा बंडखोरी करावी लागली.

जागावाटपाच्या बैठकांमध्ये वेळ वाया घालवून भाजपने शिवसेनेला झुलवत ठेवल्याची भावना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आहे. याच कारणामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासकीय दौऱ्यांना कात्री लावत ठाण्यातील निवासस्थानी राहणे पसंत केले.

उदय सामंत यांचा बचावात्मक पवित्रा

एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीमुळे सुरू झालेल्या चर्चांवर पडदा टाकण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले. “शिंदे साहेब तब्येत ठीक नसल्याने आणि वैयक्तिक कारणास्तव बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्या नाराजीच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही,” असे सामंत यांनी म्हटले आहे. तसेच मुंबईत शिवसेनेने 137 आणि 90 अशा जागांच्या वाटणीवर आरपीआयला सोबत घेऊन लढण्याची तयारी केल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुण्यातील ‘धंगेकर’ फॅक्टर आणि नेतृत्वाचा पेच

पुणे महानगरपालिकेच्या संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेवरही सामंत यांनी भाष्य केले. “धंगेकर हे पक्षाची अधिकृत भूमिका मांडणारे व्यक्ती नाहीत, ते केवळ आमचे महानगरप्रमुख आहेत. पुण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार मलाही नाहीत, त्याबाबत स्वतः एकनाथ शिंदेच योग्य वेळी भूमिका स्पष्ट करतील,” असे सांगत त्यांनी पुण्यातील जागावाटपाचा पेच अद्याप सुटला नसल्याचे संकेत दिले.

बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान

महायुती केवळ 11 ठिकाणीच झाल्यामुळे उर्वरित 18 महापालिकांमध्ये आता भाजप आणि शिंदे सेना आमनेसामने उभी ठाकणार आहे. मित्रपक्षांच्या या संघर्षाचा फायदा महाविकास आघाडीला (ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट) मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नेमके किती ‘बंडोबा’ थंड होतात, यावरच महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल.

vivek

Recent Posts