मुंबई

Eknath Shinde & Devendra Fadnavis : फडणवीसांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची आर्थिक कोंडी, तक्रार करायला पहाटे अमित शाहांना भेटले: सामना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी राज्यातील फिक्सर आणि दलालांचे पीक कापण्याचे ठरवले आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रात घाण करणाऱ्या या सर्व गटारांची सफाई करण्याचे ठरवल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्य कलेक्टर आशर प्रा. लि.हे दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळाले आहेत, असा सनसनाटी आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक करण्यात आले आहे. दलाल आणि फिक्सरांचे पीक कापण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन, पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही. कारण पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय, “मला हलक्यात घेऊ नका.” फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल, असे ‘सामना’त म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. मागच्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा धबधबा वाहत होता. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याचे राजकारण कुजले. आर्थिक बेशिस्तीने टोक गाठले. आमदार, खासदार, नगरसेवक, खऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी यांना विकत घेण्यासाठी व नंतर पोसण्यासाठी लागणारा पैसा रस्ते, बांधकाम ठेकेदार, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, एसआरए, नगरविकास खात्याची लूट करूनच जमा केला गेला. हा लुटीचा पैसा आपल्या खिशात पडावा यासाठी
अनेकांनी पक्षांतरे केली. पैशांचा हा प्रवाह आला कोठून, तर बेकायदेशीर टेंडर्स, बनावट कामे, निधीवाटपातील कमिशनबाजी, भूखंड घोटाळे, गृहनिर्माणातील दलाली या ‘आशर’ मार्गाने हा पैसा जमा झाला. शिंद्यांचे मुख्य कलेक्टर आशर प्रा. लि. हे दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळाले आहेत, अशी ताजी खबर असल्याचा दावा ‘सामना’तून करण्यात आला आहे.

फडणवीसांनी प्रकल्पांना कात्री लावल्याने एकनाथ शिंदेंची आर्थिक कोंडी झाल्याचा आरोप

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात घाण करणाऱ्या या सर्व गटारांची सफाई करण्याचे ठरवले आहे. 500 कोटींचे टेंडर तीन हजार कोटींपर्यंत वाढवून मधले हजार कोटी काम सुरू होण्याआधीच ताब्यात घ्यायचे, त्यातले शे-दोनशे कोटी चेल्यांत वाटायचे व त्या सगळ्यांना घेऊन प्रयागतीर्थी गंगास्त्रान घडवायचे. या सर्व कारनाम्यांना बूच लावण्याचे पवित्र काम श्री. फडणवीस यांनी सुरू केले आहे. त्यामुळे शिंदे व त्यांच्या लोकांची दाणादाण उडाली नसेल तर नवलच! फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणखी एक महत्त्वाचे काम केले. मंत्र्यांचे ‘पीए’ व ‘ओएसडी’ नेमण्याचे अधिकार काढून घेतले. मंत्र्यांकडून ‘पीए’ व ‘ओएसडी’ म्हणून ज्यांची नावे मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली गेली, त्यातील 16 नावे मुख्यमंत्र्यांनी थेट नाकारली. कारण हे 16 जण आधीच्या मिंधे सरकारात मंत्र्यांचे ‘ओएसडी’ बनून दलाली, फिक्सिंग करीत होते. हे सर्व ‘फिक्सर’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारले. ‘फिक्सर’ नेमू देणार नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे.

एकनाथ शिंदे काळात तर मंत्रालय हे दलाल व फिक्सरांची जत्राच झाली होती. कोणीही यावे, ‘टक्का’ ठेवावा व निधी आणि कामे मंजूर करून जावे. तिजोरीत खडखडाट असताना कामे देण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर धडाधड विकासकामांना मंजुरी दिली. ठेकेदारांनी कामे केली, पण त्या कामास रीतसर मंजुरी नसल्याने ठेकेदारांची बिले रखडली. शासकीय कामांची जवळपास 90 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे कंत्राटदार संघटनांनी म्हटले आहे. या 90 हजार कोटींतले 25 हजार कोटी रुपये आधीच ‘दलाली’ म्हणून उचलले गेले. आमदार, खासदारांना (शिंदे-अजित गट) खूश ठेवण्यासाठी त्यांनी सरकवलेल्या कागदांवर सह्या केल्या गेल्या. त्या कागदाच्या जोरावर या लोकांनी कंत्राटदारांकडून कोट्यवधींची उचल घेतली. आता या सगळ्या कामांना देवेंद्र फडणवीस यांनी कात्री लावल्याने शिंदे गटाचे गणित कोसळले. शिंदे गटाची आर्थिक कोंडीच त्यामुळे झाल्याचे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

…म्हणून एकनाथ शिंदे पहाटे अमित शाहांना भेटले: सामना

शिंदे गटात जे लोक जात आहेत ते एकतर ठेकेदार आहेत किंवा थेट लाभार्थी आहेत. शिंद्यांची दौलतजादा झेलायला ते ‘गंगुबाई’च्या कोठ्यावर जात आहेत, पण हे भ्रष्टाचाराचे कोठे व कोठयांचे दलालच नष्ट करण्याचा विडा मुख्यमंत्र्यांनी उचलला असेल तर या सगळ्या फिक्सर आणि दलालांचे कसे व्हायचे? लुटीच्या अनेक युक्त्या तीन वर्षांत समोर आल्या. फ्रान्सच्या एका कंपनीने एमएमआरडीएवर ‘कमिशन’खोरीचा आरोप केला. मेट्रोच्या उभारणीत या कंपनीचा सहभाग आहे. या कंपनीने केलेल्या नियमित कामांची बिले मुद्दाम रखडवून ठेवली जात आहेत. म्हणजे ‘आका’चे कमिशन मिळाल्याशिवाय बिले मिळणार नाहीत हे परदेशी कंपन्यांना सांगितले जाते. यात आपल्या देशाची बदनामीच सुरू आहे. शिंदे यांच्या पक्षाचे संस्थापक श्री. अमित शहा आहेत व फडणवीस यांच्या कठोर शिस्तीची तक्रार करण्यासाठी शिंदे हे पुण्यात पहाटे 4 वाजता अमित शहांना भेटले, फडणवीस आमच्या पोटावर मारत आहेत व आमदार, खासदारांची पोटे रिकामी राहिली तर तुमचा पक्ष टिकणार नाही असे शिंदे यांनी शहांच्या कानी घातले. याउलट मोदी यांची भूमिका भ्रष्टाचार खतम करण्याची आहे. “मला फक्त पैसे खाणाऱ्यांची नावे कळवा, एकेकाला सरळ करतो” असे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच जाहीर केले. श्री. फडणवीस यांनी शिंदे व त्यांच्या फिक्सर लोकांची नावे पंतप्रधान मोदी यांना कळवायला हरकत नाही, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0