महाराष्ट्र

Mumbai Crime News : मामा-मामीनेच केले 5 वर्षांच्या भाचीचे अपहरण आणि विक्री!

माणुसकीला काळिमा फासणारा गुन्हा वाकोला पोलिसांनी उघडकीस आणला; पनवेलमधून साखळीतील 5 आरोपींना अटक, मुलीला सुखरूप ताब्यात!

मुंबई (वाकोला) :- मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षांच्या चिमुकलीचे तिच्या कायदेशीर ताब्यातून अपहरण करून, तिची विक्री (Human Trafficking) करण्याच्या अत्यंत गंभीर गुन्ह्याचा वाकोला पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणात मुलीचे अपहरण करणारे तिचे मामा आणि मामी यांसह एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस पथकासमोर मोठे आव्हान

दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याने गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून, परिमंडळ-8 मधील 7 विविध पोलीस पथके तयार करण्यात आली आणि त्यांनी वेगवेगळ्या दिशांनी तपास सुरू केला.

सलग दोन दिवस रात्रंदिवस तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपास केला. मुलीला मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान एक पुरुष, एक महिला आणि एका रिक्षाचालकाने नेले असल्याची माहिती मिळाली. रिक्षाचा क्रमांक नसतानाही, रिक्षाच्या वर्णनावरून पोलिसांनी वाकोला, सांताक्रुझ परिसरातून रिक्षाचालक लतीफ अब्दूल गाजीद शेख याला ताब्यात घेतले.

अपहरण आणि विक्रीच्या साखळीचा पर्दाफाश

रिक्षाचालकाकडे कसून चौकशी केल्यावर त्याने मुलीचे अपहरण करणारे व्यक्ती तिचे मामा लॉरेन्स निकलेस फर्नांडीस (वय 42) आणि मामी मंगल दगडु जाधव (वय 38) असल्याचे सांगितले.

1.पहिली विक्री: पनवेल येथे असलेल्या पोलीस पथकाने या दोन्ही आरोपींना विठ्ठलवाडी, पनवेल येथून ताब्यात घेतले. त्यांनी कबूल केले की, त्यांनी त्यांच्या ओळखीचा इसम करन मारूती रानस यास मुलीला 90 हजार रुपयांना विकले होते.

2.दुसरी विक्री: करन रानस याला न्यू पनवेल येथून ताब्यात घेतल्यावर त्याने मुलीला वृंदा विनेश चव्हाण (वय 60) आणि अंजली अजित कोरगावकर (वय 57) या महिलांना 1.80 लाख रुपयांना विकल्याची माहिती दिली.

चिमुकली सुखरूप आईच्या ताब्यात
पोलिसांनी तातडीने आरोपींसह नमुद महिलांचा शोध घेतला असता, महिला वृंदा विनेश चव्हाण हिच्या पनवेल येथील राहत्या घरातून अपहृत मुलीला सुखरूपरित्या ताब्यात घेण्यात आले. वाकोला येथे आणून तिला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.या अत्यंत संवेदनशील गुन्ह्याचा कौशल्याने व अथक मेहनतीने तपास केल्याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या गुन्ह्यात एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे

1.लतीफ अब्दूल गाजीद शेख (रिक्षाचालक),
2.लॉरेन्स निकलेस फर्नांडीस (मामा)
3.मंगल दगडु जाधव (मामी)
4.करन मारूती रानस,
5.वृंदा विनेश चव्हाण.

पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी

पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खराडे व वैभव स्वामी, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश्वर तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक डोळे, माळी, महिला पोलीस उपनिरीक्षक सुनिता घाडगे आणि इतर अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0