पुणे

Eknath Khadse : ‘खराडी रेव्ह पार्टी’ कट: एकनाथ खडसेंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार!

•”जावयावर पाळत ठेऊन अडकवण्याचा डाव; खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न”

पुणे :- पुण्यातील खराडी येथील कथित ‘रेव्ह पार्टी’ प्रकरणात जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आता थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. प्रांजल खेवलकर यांना जाणूनबुजून अडकवण्याचा हा कट होता आणि त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती, असा दावा खडसे यांनी केला आहे. आपली संशयाची सुई कोणत्याही मंत्र्यावर नसून, पुणे पोलिसांच्या भूमिकेवरच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत पुणे पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली. ते म्हणाले, “या पार्टीत कुठलेही संगीत नव्हते, आदळाआपट नव्हती. पोलिसांनी मला जरा रेव्ह पार्टीची व्याख्या सांगावी. बदनामी करण्यासाठी पोलिसांनी ही रेड टाकली आहे. रेव्ह पार्टीच्या नावाखाली बदनामी करण्याचा हा डाव आहे. खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.”

खडसे यांनी त्यांच्या जावयाकडून मिळालेली माहितीही उघड केली. “माझ्या जावयाकडून मला ही माहिती देण्यात आली की, मी कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. माझ्यावर पाळत ठेवण्यात आली होती. सिव्हिल ड्रेसमधील पोलीस पाळत ठेवत होते,” असे खडसे म्हणाले.

“एवढी पोलिसांनी तत्परता दाखवली, तीच तत्परता लोढा प्रकरणात का दाखवली नाही?” असा सवाल करत खडसे यांनी पोलिसांच्या दुहेरी भूमिकेवर बोट ठेवले. “कोणीतरी यात सूत्रधार आहे. माझ्या परिवाराचे फोटो कसे बाहेर काढले जात आहेत? 2 ग्रॅम (ड्रग्ज) असते तर जामीन झाला असता, 2.7 ग्रॅम दाखवणे, गांजा दाखवणे, याचा अर्थ काय? मूळात म्हणजे जावयाकडे ड्रग्ज सापडलाच नाही, तो एका मुलीकडे सापडला आहे.”

मोबाईल, लॅपटॉप जप्त केला आहे. मात्र, त्या मोबाईलमधील फॅमिली फोटो बाहेर कसे आले, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. संशयाला जागा आहे. अलीकडे सरकारविरोधात रोहिणी खडसे बोलत आहेत, त्यामुळे असं बदनाम केलं जात आहे. याचा अर्थ आम्ही दबून जाऊ, असे नाही,” असा इशारा खडसे यांनी दिला. त्यांनी लोढा प्रकरणाचाही उल्लेख करत, “लोढाने मला सीडी दाखवली आहे. हे व्हायच्या आधी माझ्या जावयाने सांगितले होते.” या सर्व प्रकाराबाबत आपण पुणे पोलिसांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असून, याबाबत वकिलांशी चर्चा झाली असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0