मुंबईठाणे

Eknath Khadse : ‘चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा’! एकनाथ खडसेंची थेट मागणी

Eknath Khadse On Ajit Pawar : पार्थ पवार जमीन घोटाळ्यावर आक्रमक; ‘व्यवहारात बनवाबनवी’, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे सुपुत्र पार्थ पवार Parth Pawar यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर शासकीय जमीन 300 कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने (अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी) खरेदी केल्याचा दस्त समोर आला आहे. या 1800 कोटी रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारातील अनियमिततेवरून आता राज्याचे माजी महसूलमंत्री आणि आमदार एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी थेट अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या मुलावर जोरदार हल्लाबोल केला. “पार्थ पवारांचा जो व्यवहार झाला आहे, त्यात मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी आहे, हे आता तरी दिसत आहे. राज्य सरकारनं हा व्यवहार तात्काळ रद्द केला पाहिजे,” असे त्यांनी म्हटले आहे.

व्यवहार रद्द करण्याची कारणे स्पष्ट करताना खडसे म्हणाले की, ही जमीन महार वतनाची आहे आणि ती खरेदी करण्यासाठी महसूल आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असते, जी घेण्यात आलेली दिसत नाही. तसेच, स्टॅम्प ड्युटी माफ करताना जी कागदपत्रं दिली आहेत, ती कागदपत्रंच बनावट आहेत. “एक लाख रुपये भागभांडवल कंपनीचं आहे. त्या कंपनीनं 300 कोटी रुपयांची जमीन खरेदी कशी केली? 300 कोटी रुपये आले कसे, कोणाच्या खात्यात गेले, असे अनेक प्रश्न निर्माण होतात,” असे म्हणत त्यांनी आर्थिक अनियमिततांवर बोट ठेवले.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी खडसे यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. हे प्रकरण त्यांच्या मुलाचं आहे. मी महसूलमंत्री असताना माझ्या परिवाराचं सांगण्यात आलं होतं. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचा प्रत्यक्ष संबंध येतो. त्यामुळं चौकशी समिती काय करेल, असं सांगता येत नाही. सरकारचं सरकारच्या मुलाची चौकशी करेल आणि त्यातून काही तथ्य बाहेर येईल असं नाही.” त्यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही आणि तथ्य बाहेर येत नाही, तोपर्यंत अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देत पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित केले आहे. यावर खडसे यांनी, “या व्यवहार ज्याच्या आशीर्वादानं झाला, त्याच्यावर काय कारवाई करणार आहात?” असा थेट सवालही फडणवीसांना केला आहे.

खडसेंच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात किंवा त्यांच्याकडून कोणते स्पष्टीकरण येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0