Eid Milad Holiday : मुंबईत ईद-ए-मिलादची सुट्टी बदलली; 5 सप्टेंबर ऐवजी 8 सप्टेंबरला जाहीर

Eid Milad Holiday Latest News : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय; सुट्ट्यांच्या गोंधळामुळे पालक, शिक्षक संभ्रमात
मुंबई :- गणेश विसर्जनामुळे होणारी गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी मुस्लिम समाजाने ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलल्यानंतर राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगरांतील सुट्टीमध्ये बदल केला आहे. 5 सप्टेंबर 2025 रोजीची ईद-ए-मिलादची सुट्टी आता रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी 8 सप्टेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. 21 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत मुस्लिम संघटनांनी हिंदू-मुस्लिम एकोप्याचा संदेश देत ईद-ए-मिलादची मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दिवशी (6 सप्टेंबर) न काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, आता मिरवणूक 8 सप्टेंबर रोजी काढली जाणार आहे.
शिक्षण विभागाचा गोंधळ
सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षण विभागात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षण उपसंचालकांनी खासगी शाळांना 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबरला सुट्टी देण्याचा आदेश काढला. मात्र, पालिकेच्या शिक्षण विभागाने दोन्ही दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळात भर पडली. काही खासगी शाळांनी आधीच 5 सप्टेंबरची सुट्टी जाहीर केल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
इतर जिल्ह्यांसाठी सुट्टी कायम
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय केवळ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी लागू आहे. या दोन जिल्ह्यांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये 5 सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी कायम राहणार आहे.


