देश-विदेश
Trending

Dr Babasaheb Ambedkar  : पॅरिसमध्ये भारताचा अभिमान! युनेस्को मुख्यालयात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे दिमाखदार अनावरण

Dr Babasaheb Ambedkar  : संविधान दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने भेट दिलेल्या पुतळ्याचे अनावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीयांसाठी गौरवाची प्रतिक्रिया

मुंबई :- संविधानाचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. संविधान दिनाचे औचित्य साधत, पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालय प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा क्षण तमाम भारतीयांसाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा ठरला आहे.

महाराष्ट्राची ऐतिहासिक भेट

महाराष्ट्र राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयाला भेट म्हणून दिला होता. युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा गौरव

या ऐतिहासिक क्षणाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेने आणि प्रतिभेने जगाला समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. भारताला मिळालेले संविधान हे त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा अविष्कार आहे,” असे ते म्हणाले.
संविधान दिनीच जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला मिळालेल्या संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होणे, हा जगाकडून व्यक्त झालेला परमोच्च आदर आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

जगभर पसरतोय आंबेडकरांचा विचार

राज्य सरकारने यापूर्वी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर खरेदी करून त्याचे रूपांतर आंतरराष्ट्रीय संग्रहालयात केले आहे. तसेच, जपानमधील कोयासान विद्यापीठातही बाबासाहेबांचा पुतळा उभा आहे. आता मुंबईतील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामालाही गती देण्यात आली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0