Kokan ZP Election : 12 जिल्हा परिषदांची मतमोजणी सुरू; कोकणात महायुतीची मुसंडी, तर कोल्हापुरात काँग्रेसची आघाडी

ZP Election Latest News : सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीचे वर्चस्व, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे कडवे आव्हान
मुंबई | राज्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. 67 टक्के मतदानानंतर आज उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होत असून, राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ZP Election Latest News
जिल्ह्यानुसार ताज्या घडामोडी आणि कल
सिंधुदुर्ग: बालेकिल्ल्यात भाजपची ‘झुंज’
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. 50 पैकी 13 जागांच्या पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही (शिंदेसेना) कुडाळ परिसरात आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. येथे महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत आहे.
रायगड: शिंदेसेना आणि भाजपची जोडी जोमात
रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि शिंदेसेना प्रत्येकी 5-5 जागांवर आघाडीवर आहेत. तर अजित पवारांची राष्ट्रवादी 3 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर आघाडीवर आहे.
कोल्हापूर: ‘हात’ सरसावला!
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने 3 जागांवर आघाडी घेत आपले खाते उघडले आहे. पंचायत समितीमध्येही काँग्रेसचे 6 उमेदवार आघाडीवर असून येथे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
सोलापूर: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) खाते उघडले
सोलापूरच्या माढा तालुक्यातील भोसरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अश्विनी दळवी विजयी झाल्या आहेत. सोलापूरमध्ये अजित पवार गटाने आपला प्रभाव कायम राखल्याचे चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगर:
येथे 63 पैकी प्राथमिक कलांमध्ये भाजप 2, शिवसेना 1 आणि शिवसेना (UBT) 1 जागेवर आघाडीवर आहे.
निवडणुकीचे मुख्य आकर्षण
बिनविरोध विजयाचा ‘कोकण पॅटर्न’
मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच महायुतीने 25 जागांवर बिनविरोध विजय मिळवून आघाडी घेतली होती. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 8 आणि पंचायत समितीच्या 17 जागांचा समावेश आहे. रत्नागिरी आणि रायगडमध्येही शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.


