क्राईम न्यूज

Dombivli Ganpati Murti Sacm : गणेशोत्सवाच्या तोंडावर मूर्तिकार पसार; डोंबिवलीत गणेशभक्तांची फसवणूक, गुन्हा दाखल

Dombivli Ganpati Murti Scam News : ‘आनंदी कला केंद्रा’तील मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे बेपत्ता; 3500 रुपयांच्या मूर्तीसाठी घेतलेले पैसे घेऊन पळाला

डोंबिवली :- गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलेला असतानाच, डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशभक्तांकडून मूर्तींचे पैसे घेऊन, येथील ‘आनंदी कला केंद्रा’चे मूर्तिकार प्रफुल्ल पंढरीनाथ तांबडे अचानक पसार झाले आहेत. यामुळे अनेक गणेशभक्तांची मोठी फसवणूक झाली असून, तातडीने मूर्ती कुठून आणायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तांबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून तांबडे यांच्या केंद्रात गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरू होते. अनेकांनी 1501 रुपये आगाऊ देऊन 3500 रुपये किमतीच्या मूर्तींची नोंदणी केली होती. गणपतीच्या आदल्या दिवशी, सोमवारी रात्रीपासूनच तांबडे बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच गणेशभक्तांमध्ये गोंधळ उडाला. अधिक बुकिंग घेऊन काम पूर्ण करता न आल्यामुळे ते पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

मंगळवारी सकाळी तांबडे गायब झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि अनेक गणेशभक्त घटनास्थळी दाखल झाले. नोंदणी केलेले पैसे अडकल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला, तर काही जणांना नाइलाजाने अपूर्ण मूर्तीच घेऊन जाण्याची वेळ आली. यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला.
या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 318 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या प्रफुल्ल तांबडे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आहेत.

vivek

Recent Posts