Dombivli Crime News : कोपर उड्डाण पुलाजवळ महिलेला लुटले; भर रस्त्यात धक्का देऊन मंगळसूत्र हिसकावलं!

•चोरट्याचा रेल्वेमार्गाने पळ; डोंबिवलीत पुन्हा भुरट्या चोरांची टोळी सक्रिय
डोंबिवली | डोंबिवली पूर्वेतील कोपर उड्डाण पुलाजवळ बुधवारी सकाळी नोकरीसाठी पायी निघालेल्या गौरी म्हस्के या महिलेला अज्ञात इसमाने धक्का देऊन गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना घडली. ही घटना घडली तेव्हा परिसरात नागरिकांची वर्दळ होती, मात्र चोरट्याने चपळाईने रेल्वेमार्गाचा वापर करत कोपर रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळ काढला.
महिला खाली पडल्यामुळे त्यांच्या मानेला फटका बसला आणि नखांनी ओरबडल्याने जखमही झाली आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना बुधवार सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. गौरी म्हस्के या महिला कोपर गावात राहत असून त्या नोकरीसाठी निघाल्या होत्या. कोपर उड्डाण पुलाजवळ त्यांना एका इसमाने टार्गेट केलं. सुरुवातीला त्या इसमाने काही न करता पुढे गेला, पण काही क्षणातच परत माघारी येऊन पाठीमागून त्यांच्या गळ्यावर जोरदार हात मारून मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला.
महिलेने प्रतिकार करत मंगळसूत्र पकडून ठेवले, मात्र चोरट्याने त्यांना जमिनीवर ढकलून दिले आणि सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेला. महिला ओरडत चोरट्याच्या मागे गेल्या, मात्र तो रेल्वेमार्गात उडी मारून कोपर स्थानकाच्या दिशेने निघून गेला.
या घटनेनंतर दोन दिवसांपूर्वीच ठाकुर्ली परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवले गेले होते. त्यामुळे डोंबिवली परिसरात भुरट्या चोरांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विष्णुनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, चोरट्याचा डोंबिवली पूर्व भागातील झोपडपट्टीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


