Dombivli Crime News : डोंबिवली पोलिसांची धडक कारवाई! आंतरराज्यीय ‘चैन स्नॅचिंग’ टोळीचा पर्दाफाश

•उत्तर प्रदेश आणि पुण्यातून दुचाकी चोरून डोंबिवलीत दरोडे; तीन आरोपींना अटक
डोंबिवली :- डोंबिवली पोलिसांनी एका मोठ्या आंतरराज्यीय ‘चेन स्नॅचिंग’ टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी पुणे येथून दुचाकी चोरून डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात दरोडे टाकत होती. पोलिसांनी सापळा रचून या टोळीतील तिघा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि लाखो रुपयांचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी दिला सुगावा
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली परिसरात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. 3 सप्टेंबर रोजी ठाकुर्ली येथील एका वृद्ध महिलेची चैन हिसकावून दोन दुचाकीस्वार पळून गेले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी विशेष शोध पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि आसपासच्या 106 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.
आरोपींकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि चोरीचे दागिने जप्त; अनेक गुन्हे उघड
या तपासणीदरम्यान, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पुणे येथून चोरीला गेल्याचे उघड झाले. यामुळे आरोपींनी मोटारसायकल चोरी करून डोंबिवलीमध्ये येऊन दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेत, सुनिल नगर, डोंबिवली येथे सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून गावठी कट्टा जप्त
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघा आरोपींची नावे अभय सुनिल गुप्ता (21 वय), अभिषेक ओमप्रकाश जौहरी (32 वय), आणि अर्पित उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला (27 वय) अशी आहेत. हे सर्वजण उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांच्या झडतीमध्ये अभय गुप्ताकडे एक गावठी कट्टा आणि अभिषेक जौहरीकडे चार जिवंत काडतुसे सापडली. तसेच, त्यांच्याकडून डोंबिवली आणि मानपाडा पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील सोन्याचे दागिने आणि पुण्यातून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या अटकेमुळे पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोंबिवली पोलीस दलाचे कौतुक केले आहे.



