Divya Deshmukh : महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने रचला इतिहास! बुद्धिबळ विश्वचषकावर कोरले नाव, कोनेरू हम्पीला नमवले

FIDE Womens World Chess Championship Final Match Result : 19 वर्षीय दिव्या बनली FIDE विश्वचषक विजेती; भारताला मिळाले चौथे महिला ग्रँडमास्टर
मुंबई :- भारताची युवा आणि प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख Divya Deshmukh हिने जॉर्जियाच्या बटुमी येथे पार पडलेल्या एफआयडीई महिला विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 19 वर्षीय दिव्याने अंतिम फेरीत भारताचीच अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिचा कडवा पराभव करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. टायब्रेकरमध्ये गेलेल्या या रोमांचक सामन्यात दिव्याने उत्कृष्ट चाली चालत आपला दबदबा निर्माण केला.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडू समोरासमोर असल्याने विश्वविजेतेपद भारतातच येणार हे निश्चित होते. दोघींपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती, आणि काल (28 जुलै रोजी) अंतिम सामन्यात दिव्या देशमुखने आपल्या संयम, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोनेरू हम्पीला टायब्रेकमध्ये नमवून शानदार विजय मिळवला.
राज ठाकरेंकडून दिव्याचे खास कौतुक
दिव्याच्या या नेत्रदीपक विजयानंतर तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील खास शब्दांत दिव्याचे अभिनंदन केले आहे. राज ठाकरे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत म्हटले आहे की, “अवघ्या 19 वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं असतं हा देखील आनंदाचा भाग. पण दिव्याचं मनापासून अभिनंदन.”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “या निमित्ताने अधिकाधिक महिला बुद्धिबळपटू तयार होऊ देत, त्यांना विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळू दे हीच इच्छा. महाराष्ट्राकडे बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे, ते जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचं नाव मोठं करायला वापरलं जातं तेव्हा खूप आनंद होतो. दिव्या तुझं पुन्हा एकदा अभिनंदन!”



