Dhanajay Munde : “माझ्या वडिलांची उणीव भासू दिली नाही…” धनंजय मुंडेंचा टाहो; अजित पवारांच्या निधनाने ‘पवार निष्ठावान’ पोरके!

Dhanajay Munde On Ajit Pawar: अजितदादा केवळ नेतेच नव्हे तर ‘आधारवड’ होते; मुंडे, लंके आणि मुश्रीफ यांना अश्रू अनावर
बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘कारखानीस’ आणि कामाचा झपाटा असलेले नेतृत्व अजित पवार यांच्या अपघाती निधनाने केवळ राजकीय पोकळीच निर्माण झाली नाही, तर त्यांच्यासोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या सहकाऱ्यांचे वैयक्तिक छत्रही हरपले आहे. अजितदादांच्या जाण्याने त्यांचे खंदे समर्थक आणि मंत्री धनंजय मुंडे यांना प्रचंड धक्का बसला असून, त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना दाटून आलेला कंठ आणि डोळ्यांतील अश्रू रोखता आले नाहीत.
“मी पोरका झालो…” : धनंजय मुंडे
अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले,”वडील गेल्यानंतर माझ्यासारख्याला कधीही वडील नसल्याची जाणीव दादांनी होऊ दिली नाही. संकटाच्या काळात ते नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज दादांच्या जाण्याने मी पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने पोरका झालो आहे.”
निलेश लंके आणि हसन मुश्रीफ यांचा आक्रोश
केवळ धनंजय मुंडेच नव्हे, तर खासदार निलेश लंके आणि मंत्री हसन मुश्रीफ हे देखील आपल्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने पूर्णपणे खचले आहेत. “दादांनी आम्हाला राजकारणात बोट धरून चालायला शिकवले, कार्यकर्त्यांना कसे जपावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते,” अशा भावना व्यक्त करत या नेत्यांनी जित पवारांच्या ‘पितृतुल्य’ प्रतिमेचे स्मरण केले.



