महाराष्ट्र
Trending

Devendra Fadnavis : ‘सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेणार!’ अहिल्यानगर तणावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक कारवाईचा इशारा

Devendra Fadnavis On Ahilyanagar : ‘आय लव्ह मोहम्मद’ रांगोळीवरून वाद चिघळला; मुस्लिम समाजाने महामार्ग रोखल्याने पोलिसांकडून बळाचा वापर

अहिल्यानगर :- अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहरात धार्मिक मुद्यावरून निर्माण झालेल्या तणावावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात अहिल्यानगर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर येथे सोमवारी ‘आय लव्ह मोहम्मद’ (I Love Mohammad) असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती. याच मुद्यावरून शहरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने रांगोळी काढणाऱ्या एका समाजकंटकाला अटक केली होती.

रास्ता रोको आणि दगडफेक

या अटकेनंतरही मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी कोटला परिसरात पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विनंती करूनही जमावाने रस्ता सोडण्यास नकार दिला आणि अचानक दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करून जमावाला पांगवावे लागले आणि काही लोकांना ताब्यात घेण्यात आले.

‘हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे का?’

पत्रकारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी सध्या प्राथमिक माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र, महाराष्ट्रात काही बोर्ड लावणे किंवा अशा प्रकारे सामाजिक आरोग्य बिघडवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत का, यावर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले, “अलीकडच्या काळात काहीतरी प्रयत्न होत आहे की, महाराष्ट्रात काही बोर्ड लावायचे किंवा काहीतरी करायचे. यामागे नेमके कोण आहे? हे आपल्याला शोधावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी जसे लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसाच प्रयत्न होत आहे का? याकडेही लक्ष द्यावे लागेल, आणि आम्ही नक्कीच आरोपींचा शोध घेऊन कारवाई करू,” असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0