Devendra Fadnavis : “त्रिभाषा सूत्र लागू करणारच!” – फडणवीसांचा स्पष्ट इशारा; ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर टीकास्त्र

Devendra Fadnavis : हिंदी सक्ती नसली तरी त्रिभाषा धोरण 100 टक्के राबवणार – मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट
मुंबई : राज्यात सध्या गाजत असलेल्या त्रिभाषा सूत्राच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत “हा विषय आमच्यासाठी प्रतिष्ठेचा नसला, तरी त्रिभाषा सूत्र 100 टक्के लागू करणारच” असा ठाम इशारा दिला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवर नाराजी व्यक्त केल्यानंतरही, फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाबाबत कोणताही गोंधळ न ठेवता भाषिक विविधतेच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी ‘मुंबई तक’ या यूट्यूब कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. त्यावेळी त्यांनी त्रिभाषा सूत्रासंदर्भातील गोंधळाची पार्श्वभूमी स्पष्ट करत, “हिंदी सक्ती नको, पण पर्याय हवे. कोणतीही भारतीय भाषा तिसऱ्या भाषेसाठी स्वीकारता येईल,” असं स्पष्ट केलं. यासाठी 20 विद्यार्थीही आवश्यक नाहीत, गरज असल्यास ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय देण्यात येईल, असं त्यांनी नमूद केलं.
“गोलपोस्ट सतत बदलले जातात, पण धोरण ठाम राहील”
फडणवीस पुढे म्हणाले, “सुरुवातीला प्रश्न हिंदी अनिवार्यतेचा होता, नंतर विचारलं गेलं – तिसरीपासून का? सहावीपासून का नाही? – यामुळे आम्ही सर्व संबंधितांशी चर्चा करून नव्याने समिती स्थापन केली आहे.” “त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करायचं की सहावीतून – हे समिती ठरवेल. पण लागू होणार हे निश्चित,” असं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका – “त्यांनीच समिती नेमली, आता पलटी घेतली”
या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ठाकरे गटावर टीका करत म्हटलं, “उद्धव ठाकरे यांनीच सत्तेत असताना त्रिभाषा सूत्रासाठी समिती नेमली होती. त्यांचा उपनेता त्या समितीवर होता. पहिली ते बारावी हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करण्याचा विचारही त्यांनीच मांडला होता. आता ते भूमिका बदलत आहेत – हे आश्चर्यकारक आहे.”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदीला विरोध नसल्याचं म्हटलं असलं तरी हिंदी सक्ती नको हा त्यांचा सूर होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं की, “इंग्रजीसाठी पायघड्या आणि भारतीय भाषांवर विरोध – हे मी सहन करणार नाही.”


