
Devendra Fadnavis On Navi Mumbai Airport : 90 च्या दशकातील संकल्पना आज नवभारताचं प्रतीक’; वॉटर टॅक्सीने थेट गेटवे ऑफ इंडियाला जाता येणार ; फडणवीसांकडून पंतप्रधानांचे आभार
नवी मुंबई :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय Navi Mumbai Airport विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि विमानतळाच्या कामाला गती कशी मिळाली, याचा एक महत्त्वपूर्ण किस्सा सांगितला. आजचा दिवस हा ‘स्वप्नपूर्तीचा दिवस’ असल्याचे ते म्हणाले.
‘नव्वदीतील संकल्पना, आज नवभारताचं प्रतीक’
फडणवीस म्हणाले की, “आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. गेल्या दहा वर्षांपासून ज्या गोष्टी आम्ही सांगतो आहोत, त्या गोष्टी आज लोकार्पित होत आहेत, ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. आज झालेले विमानतळ हे नवभारताचं प्रतीक आहे.” हे विमानतळ नव्वदीच्या दशकात संकल्पित झाले होते, पण अनेक वर्षे मुंबईहून पुण्याला जाताना केवळ फलक दिसत होता, पुढे काहीही घडत नव्हते, असे त्यांनी नमूद केले.
मोदींच्या एका बैठकीत सात ‘एनओसी’चा चमत्कार
विमानतळाचे काम सुरू होण्यास विलंब होण्याचे मुख्य कारण आठ ‘एनओसी’ (ना हरकत प्रमाणपत्र) मिळत नव्हत्या, हे होते. फडणवीस यांनी सांगितले की, “ज्यावेळी मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आले, तेव्हा नवी मुंबई विमानतळ प्रगतीमध्ये घ्यावे, अशी विनंती आम्ही मोदींना केली.”
ते पुढे म्हणाले, “मोदींनी ‘प्रगती’ची पहिली बैठक घेतली, तेव्हा सकाळपर्यंत आम्हाला सात एनओसी मिळाल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारलं की, आठव्या एनओसीचं काय? त्याला एक महिन्याची नोटीस होती. ती निघाली होती. पंधराव्या दिवशी ती एनओसी आली आणि त्यानंतर जे दहा वर्षे झालं नव्हतं, ते मोदींच्या एका बैठकीत झालं.” अत्यंत सुंदर असं 9 कोटी प्रवासी क्षमता असलेलं हे विमानतळ बांधले असून, ते इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
वॉटर टॅक्सीने थेट गेटवे ऑफ इंडिया
या विमानतळामुळे महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढवण्याची क्षमता आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांनी यावेळी मुंबईतील कनेक्टिव्हिटीतील भविष्यातील सुविधांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “हा पहिला एअर पोर्ट असेल ज्यात वॉटर टॅक्सी मिळणार आहे. इथल्या वॉटर टॅक्सीत बसून आपल्याला थेट गेटवे ऑफ इंडियाला जाता येईल, अशी व्यवस्था या ठिकाणी असेल.”
याशिवाय, चाळीस किमीची भूमिगत मेट्रो देखील मोदींच्या आशीर्वादाने सर्व अडथळे पार करून तयार झाली. “ग्रीन ट्रिब्यूनल, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्या अडचणी येऊनही आम्ही हे काम पूर्ण करू शकलो, कारण नरेंद्र मोदी आमच्या पाठिशी होते,” असे म्हणत फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.



