
Sanjay Raut On Devendra Fadnavis : ‘अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारले,’ राऊतांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केली भीती
मुंबई :- भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावरून आता भारतीय राजकारणातही चर्चा सुरू झाली आहे. नेपाळमधील वाढता जनआक्रोश आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील आंदोलनावर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी एक सूचक टिप्पणी केली आहे. त्यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट टॅग करून ‘भारताला सावध’ राहण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राऊतांचे सूचक ट्विट
नेपाळमधील हिंसाचाराचा एक व्हिडिओ शेअर करत राऊत यांनी म्हटले आहे की, “ही परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते. सावध व्हा. भारत माता की जय, वंदे मातरम!” या व्हिडिओमध्ये नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलक पळवून पळवून मारत असल्याचा दावा करण्यात आला आहे. राऊत यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी, भाजप आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनाही टॅग केले आहे, ज्यामुळे त्यांच्या टीकेचा रोख थेट केंद्र सरकारवर असल्याचे दिसून येते.
नेपाळमध्ये नेमके काय घडत आहे?
गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सरकारविरोधात तीव्र जनआंदोलन सुरू आहे. सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले. आंदोलकांनी संसद, शासकीय इमारती आणि माजी नेत्यांच्या घरांना लक्ष्य केले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत जवळपास 20 आंदोलक तरुण ठार झाल्याची माहिती आहे. वाढत्या जनआक्रोशासमोर नमते घेत नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या शेजारी देशांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र असंतोष पसरल्याचे चित्र अलीकडच्या काळात दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी केलेल्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.


