मुंबईठाणे
Trending

Devendra Fadnavis : पाच वर्षात मुंबई जगातील प्रगत राजधान्यांना मागे टाकेल! दावोसला रवाना होताना देवेंद्र फडणवीसांचा बुलंद विश्वास

Maharashtra Political Latest News : 20 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य; जगभरातील मराठी बांधवांना जोडण्यासाठी ‘महाएनआरआय कनेक्ट’ प्लॅटफॉर्मची घोषणा

झ्युरिक/मुंबई l थेट परदेशी गुंतवणूक, स्टार्टअप आणि उत्पादनासह सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असून, राज्याची स्पर्धा आता इतर कोणत्याही राज्याशी नसून ती जागतिक स्तरावर आहे. येत्या पाच वर्षांत मुंबईचा विकास अशा गतीने होईल की, ती जगातील कोणत्याही विकसित राष्ट्राच्या राजधानीपेक्षा अधिक प्रगत दिसेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी (WEF) रवाना होण्यापूर्वी झ्युरिक विमानतळावर बृहन महाराष्ट्र मंडळाने केलेल्या जंगी स्वागतावेळी ते बोलत होते. Maharashtra Political Latest News

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरच्या दिशेने नेण्यासाठी दावोस परिषद ही ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’साठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राने 16 लाख कोटींचे गुंतवणूक करार केले होते, तर यावर्षी हे उद्दिष्ट 20 लाख कोटींच्या पुढे नेण्याचा राज्याचा निर्धार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्याचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी होणार आहे. “देशाचे विकास इंजिन म्हणून महाराष्ट्राच्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे संपूर्ण जग अपेक्षेने पाहत आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. मुंबईसोबतच पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या शहरांचाही कायापालट केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी जगभरातील मराठी बांधवांसाठी ‘महाएनआरआय कनेक्ट’ या विशेष प्लॅटफॉर्मची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या मूल्यांना जपत जगभरातील मराठी उद्योजक आणि उपक्रमांना एकत्र जोडणे, हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश असेल. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा अभिमान व्यक्त करत, या भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. केवळ भौतिकच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक समृद्ध समाज असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये महाराष्ट्राचेच वर्चस्व दिसेल, असा हुंकार भरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0