•”वाद मिटवा, नाहीतर पक्षच खड्ड्यात घालेल”; मुख्यमंत्र्यांचा गटबाजी करणाऱ्यांना कडक इशारा
नागपूर :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यात विदर्भ भाजपच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचा मंत्र देत, गटबाजी करणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले, तसेच पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन केले.
“वाद उकरून काढले जातील, पण काम लोकांना सांगा”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आता निवडणुकीच्या तोंडावर अनेक वाद उकरून काढले जातील. आपण केलेले काम लोकांना समजू नये, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही त्यांनी असे वाद उभे केले होते. पण आपण आपले काम घेऊन जनतेमध्ये गेलो आणि लोकांनी आपल्याला मतदान केले. त्यामुळे आताही आपल्याला लोकांमध्ये जाऊन सरकारने केलेले काम आणि सरकारचे व्हिजन त्यांच्यासमोर मांडायचे आहे.”
आगामी निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. “मला असे वाटते की, आपल्याला आता तयारीला लागायला पाहिजे. जिल्हा परिषद किंवा नगरपालिका यापैकी एकाच्या निवडणुका आधी होतील आणि शेवटी महानगरपालिका निवडणुका होतील. 2017 मध्येही अशाच प्रकारे तीन टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्याचप्रमाणे निवडणूक आयोग या निवडणुका घेईल,” असे फडणवीस म्हणाले.
पक्षामधील गटबाजीबद्दल मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहेत. पण भाजपा म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये वाद आहेत. काही ठिकाणी नेत्यांमध्ये, तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद आहेत. हे वाद फार मोठे नाहीत. पक्ष एक कुटुंब आहे, कुटुंबात कमी-जास्त होत असते. पण निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, एकत्र बसले पाहिजे आणि वाद संपवले पाहिजेत.”
पुढे इशारा देताना फडणवीस म्हणाले, “हे बघा, एकमेकांच्या चढाओढीमुळे अनेक पक्ष संपले. असे प्रकार आपल्या पक्षात होऊ नयेत. जर कोणी पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल, तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पक्ष करेल, हे लक्षात ठेवा.”
दरम्यान, येत्या काही महिन्यांतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र निवडणूक लढवण्याच्या हालचाली करत असल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेला ‘एकजुटीचा’ आणि ‘शिस्तबद्धतेचा’ मंत्र भाजप कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…