Anil Deshmukh : “माझ्यावर दगडफेक करून हल्लाच झाला!” फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे अनिल देशमुखांचे फडणवीस आणि सरकारवर थेट आरोप

•दहा किलोचा दगड मारल्याने गाडीची काच फुटली, कपाळाला दुखापत; ‘सलीम जावेदची स्टोरी’ म्हणणाऱ्यांना देशमुखांचा पलटवार.
मुंबई :- काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणाला सुरुवातीपासूनच राजकीय रंग देण्यात आल्याचा थेट आरोप केला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टचा हवाला देत देशमुख यांनी आपल्यावर दगडफेक करून हल्लाच झाला असल्याचे ठामपणे सांगितले आणि तत्कालीन वक्तव्यांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
दहा किलोच्या दगडाने हल्ला?
अनिल देशमुख यांनी फॉरेन्सिक रिपोर्टमधील तपशील माध्यमांना सांगितला. ते म्हणाले, “फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, एका इसमाने गाडीवर लहान दगड मारला, तर दुसऱ्या इसमाने दहा किलोचा मोठा दगड मारला. रस्त्यावर मोठे वळण असल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता. या दगडामुळे गाडीची काच फुटली आणि माझ्या कपाळाला जखम झाली.”
या घटनेनंतर लगेचच राजकीय दबावापोटी एसपींनी कोणत्याही फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता या घटनेबद्दल राजकीय उल्लेख केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही ‘ही घटना सलीम जावेदची स्टोरी आहे,’ असे म्हणून घटनेला राजकीय रंग दिला, असे गंभीर आरोप देशमुख यांनी केले.
‘रिपोर्ट सार्वजनिक करणार’
फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सरळ सरळ दगड मारल्याने हल्ला झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दगडफेक करणाऱ्या दोन व्यक्तींची व्यवस्थित चौकशी करून त्यांना तातडीने पकडायला पाहिजे होते, अशी भूमिका देशमुखांनी मांडली.
क्लोजर रिपोर्टनंतर संतापलेले देशमुख म्हणाले, “आरोपी सापडले नाहीत, या संदर्भात रिपोर्ट द्यायला पाहिजे होता. मी फॉरेन्सिक रिपोर्ट पाहिला आहे. मी गृहमंत्री होतो, आम्हालाही पोलीस खात्याकडून कागदपत्रे मिळतात. आता आलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढे करू.”
अनिल देशमुख यांनी आपण लवकरच हा फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेपुढे आणणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.


