मुंबईठाणे
Trending

Mumbai Mega Block News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ‘मेगाब्लॉक’चा धडाका; अनेक स्थानकांचे थांबे रद्द

Mumbai Local Train News : विद्याविहार, नाहूरसह पाच स्थानकांवर लोकल थांबणार नाही; ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा 5 तास ठप्प

मुंबई | मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर या रविवारी देखभालीच्या कामांसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईकरांच्या विकेंडच्या नियोजनाला मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान होणाऱ्या तांत्रिक कामांमुळे विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर यांसारख्या स्थानकांचा संपर्क तुटणार असून, पश्चिम रेल्वेवर प्रभादेवी उड्डाणपूल पाडण्यासाठी चक्क 13 तासांचा ‘मेगा’ अडथळा निर्माण होणार आहे. ट्रान्सहार्बरची सेवाही 5 तास पूर्णपणे ठप्प राहणार असल्याने प्रवाशांना लोकलच्या उशिराचा आणि रद्द होणाऱ्या फेऱ्यांचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वे: माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर कपात

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि ठाण्याकडून येणाऱ्या धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे, फलाट उपलब्ध नसल्यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. तसेच, सर्व लोकल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.

ट्रान्सहार्बर मार्ग: ठाणे-वाशी सेवा पूर्णपणे बंद

ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या 5 तासांच्या कालावधीत ठाणे ते वाशी, नेरुळ आणि पनवेल दरम्यानची अप व डाऊन रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. यामुळे ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

पश्चिम रेल्वे प्रभादेवी उड्डाणपूल पाडण्यासाठी 7.30 तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर प्रभादेवी येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी मध्यरात्री 11.30 ते रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. या काळात महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या स्थानकांवर डाऊन लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांची सोय म्हणून रेल्वेने दादर किंवा वांद्रे येथून उलट दिशेने (अप मार्ग) प्रवास करण्याची मुभा दिली आहे.

ग्रांट रोड ते मुंबई सेंट्रल: 13 तासांचा जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरच पूल क्रमांक 5 च्या पुनर्बांधणीसाठी शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 13 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येईल. या काळात मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट दरम्यानच्या धीम्या लोकल जलद मार्गावरून चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे लोअर परळ आणि माहीम स्थानकांवरील थांबे देखील रद्द करण्यात आले आहेत. काही लोकल रद्द केल्या असून काही लोकल वांद्रे किंवा दादरपर्यंतच धावतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0