मुंबई

Devendra Fadnavis : मालेगाव स्फोटात निर्दोष सुटका : फडणवीसांचा काँग्रेसवर गंभीर आरोप, ‘हिंदू समाजाची माफी मागा!’

तत्कालीन यूपीए सरकारवर ‘हिंदू दहशतवादाचा नॅरेटिव्ह सेट केल्याचा’ ठपका; उद्धव ठाकरेंनाही लक्ष केले

मुंबई :- 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही आरोपींना विशेष न्यायालयाने गुरूवारी (आज) निर्दोष मुक्त केल्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारवर त्यांनी ‘हिंदू दहशतवादाचा नॅरेटिव्ह’ तयार केल्याचा गंभीर आरोप करत, संपूर्ण हिंदू समाजाची जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू आतंकवादाचा, भगव्या आतंकवादाचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगूनचालन करण्यासाठी हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा प्रचार केला होता. तो प्रचार किती खोटा होता हे आज उघड झालं आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, “ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, तो प्रयत्न किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्यानिशी सांगितलं आहे.”

फडणवीस यांनी मागणी केली की, “मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ज्यांच्यावर यूपीए सरकारने कारवाई केली होती, त्यांची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. तसेच संपूर्ण हिंदू समाजाची देखील काँग्रेसने माफी मागितली पाहिजे, ज्या प्रकारे भगवा आतंकवाद दाखवून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.”

बॉम्बस्फोट कोणी केला, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “हे पोलीस सांगतील. तसेच त्या वेळच्या तपास यंत्रणांनी काय तपास केला हे विचारावं लागेल. आता सर्वांना कल्पना आहे की, उद्धव ठाकरे आता ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत, त्यांचं सरकार (काँग्रेस) त्यावेळी होतं. त्यामुळे त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे.” भगव्या आतंकवादाचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करायला पाहिजे होते, मात्र ते ‘लांगूनचालन’ करणाऱ्यांबरोबर गेल्याने असं करणार नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0