Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील 5 व्यक्तींना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन
Republic Day 2025 : महाराष्ट्रातील पाच व्यक्तींनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी तीन जणांना पद्मभूषण आणि दोघांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.
मुंबई :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 साठी देशातील सर्वोच्च सन्मान पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षी एकूण 139 जणांना हा सन्मान मिळणार आहे. यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री यांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील पाच व्यक्तींनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी तीन जणांना पद्मभूषण आणि दोघांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी दोघांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे.
कला, समाजसेवा, सार्वजनिक जीवन, विज्ञान, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात.देशातील सर्वोच्च सन्मान प्राप्त करणाऱ्यांमध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, ज्येष्ठ गायक पंकज उधास आणि शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.तर होमिओपॅथीच्या माध्यमातून लाखो गरजूंची सेवा करणारे मराठी लेखक मारुती भुजंगराव चितमपल्ली आणि डॉ.विलास डांगरे यांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनंदन केले आहे. त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले की, “लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना मी अभिवादन करतो.
अलिकडेच आम्ही अशोकमामांना महाराष्ट्र भूषण प्रदान केला आणि आज त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, याचा मला विशेष आनंद आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अरण्यऋषी म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो त्या मारुती चितमपल्ली यांनी पशु-पक्षी आणि झाडा-फुलांतून जे साहित्य उभे केले, त्याला तोड नाही. पहिला पक्षीकोष त्यांनी तयार केला. 18 भाषा ज्ञात असलेल्या चितमपल्लींनी 21 हून अधिक ग्रंथ लिहिले. निसर्ग हा प्राणमय जीव आहे, ही धारणा घेऊन जगताना त्यांनी केलेले पर्यावरण संवर्धनाचे कार्य खूप मोठे आहे. सोलापूरचे असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र विदर्भ.
डॉ. विलास डांगरे यांनी होमिओपॅथीच्या माध्यमातून लाखो गरजूंची केलेली रुग्णसेवा याला तोड नाही. विशेषत: अलिकडे तर प्रकृतीच्या अडचणी असतानाही त्यांनी कधीच त्याला आपल्या सामाजिक सेवेत अडसर बनू दिले नाही. नागपूर-विदर्भातील या दोन्ही रत्नांचा हा अनोखा सन्मान आहे. मी त्यांचेही विशेष अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.