
Raj Thackeray Miraroad Sabha : मराठी दुकानदार प्रकरणानंतर पेटलेला वाद, अवघ्या 10 दिवसांत राज ठाकरेंची मैदानात एण्ट्री
मीरा रोड :- काही दिवसांपूर्वी मिरा रोडमधील मराठी भाषेवरून पेटलेला वाद आणि मनसे कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण, त्यानंतर व्यापाऱ्यांचे आंदोलन, मनसेचा मोर्चा… आणि अखेर यातूनच उभ्या राहिलेल्या राजकीय तापलेल्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा रोडमध्ये पार पडणार आहे. Raj Thackeray Miraroad Sabha या सभेला पोलिसांनी अखेर सशर्त परवानगी दिली असून, यामुळे मिरा भाईंदर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सशर्त परवानगी – काय आहेत नियम?
मनसे शहरप्रमुख संदीप राणे यांनी मिरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालय कडे सभा परवानगीची विनंती केली होती. यावर कारवाई करत परिमंडळ-1 च्या पोलिसांनी अटींसह सभा घेण्यास परवानगी दिली. यामध्ये वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी, मंडप-खुर्च्यांची नियमपूर्व व्यवस्था, आणि ड्रोन वापरास मर्यादित परवानगी यांचा समावेश आहे.
सभेच्या ठिकाणी अग्निशमन दल व ध्वनी नियंत्रणासाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एका अटीचा भंग झाला तरी परवानगी तत्काळ रद्द होईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
मनसेचा ‘सन्मान’ मोर्चा की शक्तिप्रदर्शन?
मिरा रोडमधील बालाजी चौकात घडलेल्या प्रकारानंतर मनसेने याच ठिकाणी सभा आयोजित केली असून, ही सभा केवळ उद्घाटनासाठी नसून, राजकीय शक्तिप्रदर्शन ठरणार, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पोलिसांनी याआधी याच प्रकारच्या मोर्चा आणि सभांना नकार दिला होता, त्यामुळे या सभेवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



