Devendra Fadnavis : घराणेशाहीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला
•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रचारार्था सभा
सोलापूर :- माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेच निवडून येणार आहेत. निंबाळकरांनी मोदी यांच्या आशीर्वादाने दिलेले शब्द पूर्ण केले आहेत. 50 वर्ष ज्यांना नेतृत्व दिले, ते प्रत्येक निवडणुकीत तीच-तीच भाषणं, घोषणा करत होते. मात्र घोषणांची पूर्तता कधीही झाली नाही,” अशी टीकाही अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली आहे.
मोहिते-पाटील घराण्याने आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले, खून केले. मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी या माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवत आहेत. यावेळी फडणवीस बोलत होते
घराणेशाहीवरुन शरद पवार, सुशीलकुमार शिंदेंवर निशाणा दरम्यान पुढे फडणवीस म्हणाले, “काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आम्ही 20 वर्षांनी एकत्र आल्याचे सांगितले. आम्ही पुढच्या पिढीच्या भल्यासाठी एकत्र आलो, असे ते लोकांना सांगत होते. पण हे तिघे आपापल्या घरातील पुढच्या पिढीसाठी एकत्र आले आहेत. शरद पवार हे सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे हे प्रणिती शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे त्यांच्या घराण्यातील पुढच्या पिढीसाठी एकत्र आले आहेत”, अशी टीका फडणवीसांनी केली.
ठोकशाही चालू देणार नाही यावेळी फडणवीस यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात माढ्यात उभ्या असणाऱ्यांचा इतिहास बघा. या तालुक्याला मी त्यांच्या दहशतीपासून मुक्त करणार आहे. त्यांनी आजवर अनेक लोकांचे खून केले, अनेकांच्या जमिनी बळकावल्या गेल्या, कित्येक जणांवर हल्ले झाले. मात्र, आता हे हल्ले सहन केले जाणार नाहीत. ही लोकशाही आहे. त्यामुळे इकडे ही ठोकशाही चालू देणार नाही”, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.