
Vice President election : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या पदासाठी भाजपच्या संसदीय मंडळाने राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाचे Vice President election उमेदवार म्हणून निवड करण्यात आल्याने, त्यांना या राज्याच्या राज्यपालपदी असतानाच उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळाली आहे. अशाप्रकारे राज्यपालपदी असताना उपराष्ट्रपतीपदी निवड होणारे ते राज्याचे दुसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी 1987 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल शंकर दयाळ शर्मा यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. या दोन्ही नेत्यांच्या निवडीचा एक योगायोग म्हणजे, दोघांचीही आधीच्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड झाली आहे.


भाजपच्या संसदीय मंडळाची निवड
ज्येष्ठ नेते जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी भाजपच्या संसदीय मंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 31 जुलै 2024 रोजी नियुक्ती झाली होती. त्यांनी राज्यपाल म्हणून 1 वर्ष 17 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. लोकसभा आणि राज्यसभा मिळून भाजप आणि रालोआकडे पुरेसे संख्याबळ असल्याने राधाकृष्णन यांची निवड निश्चित मानली जात आहे.
शंकर दयाळ शर्मा यांच्याप्रमाणेच योगायोग
माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचीही अशीच निवड झाली होती. एप्रिल 1986 ते सप्टेंबर 1987 या काळात ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तत्कालीन उपराष्ट्रपती आर. वेंकटरामन यांनी राष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शंकर दयाळ शर्मा यांची बिनविरोध उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. पुढे 1992 मध्ये ते राष्ट्रपतीही झाले.
तमिळनाडूच्या राजकारणावर परिणाम
मूळचे तमिळनाडूचे असलेले सी. पी. राधाकृष्णन हे कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. पुढील वर्षी तमिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आपले पाय रोवायचे आहेत. अशा परिस्थितीत राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी संधी देऊन भाजप तमिळनाडूत राजकीय फायदा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी, द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर भाजपने ओडिशातही असाच प्रयोग केला होता. त्यामुळे, हाच प्रयोग तमिळनाडूतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


