“धनुष्यबाणावर निर्णायक रणसंग्राम! 14 जुलैला सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची अंतिम लढत”

•शिवसेनेचं नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी
मुंबई | शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 14 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तब्बल दीड वर्षांनंतर या प्रकरणावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव-चिन्ह वादात देखील याच खंडपीठाने सुनावणी करत महत्वाचे अंतरिम आदेश दिले होते. त्याचप्रमाणे आता ठाकरे गटाकडून अपेक्षा आहे की, शिवसेनेच्या बाबतीतही तशाच तात्पुरत्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब व्हावा.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे सुपूर्त केल्यानंतर, ठाकरे गटाने त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे की, या निर्णयामुळे मूळ शिवसेना कार्यकर्त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तसेच यामागे राजकीय दबावाची छाया होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात, कोर्टाने अजित पवार गटाला चिन्हाच्या वापराबाबत जाहिर कबुली देण्यास सांगितलं होतं, की ते फक्त अंतिम सुनावणी होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह वापरत आहेत.ठाकरे गटानंही न्यायालयाला तसेच निर्बंध शिंदे गटावर घालावेत, अशी मागणी केली आहे.


