Daya Naik : ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांना निवृत्तीपूर्वी ACP पदी बढती!

Encounter Specialist Daya Naik : मुंबईतील अंडरवर्ल्डविरोधात केलेल्या कामाची अखेर दखल; गुन्हे शाखेतून झाली बढतीची घोषणा
मुंबई :- 1990 च्या दशकात मुंबई पोलीस Mumbai Police दलात ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ Daya Naik म्हणून आपली ओळख निर्माण करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी दया नायक हे आजही अंडरवर्ल्डविरोधातील संघर्षाचे प्रतीक मानले जातात. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 80 पेक्षा जास्त कुख्यात गुंडांचा एन्काऊंटर केला असून, आता त्यांना सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदी बढती मिळाली आहे. त्यांचा प्रवास हा एका सामान्य व्यक्तीपासून ते मुंबई पोलीस दलातील एका मोठ्या नावापर्यंतचा आहे. Mumbai Police Latest News

कर्नाटक ते मुंबई: एका हॉटेल कामगाराचा पोलीस दलातील प्रवेश
कर्नाटकातील उडुपी येथे एका कोकणी भाषिक कुटुंबात जन्मलेले दया नायक यांचे प्राथमिक शिक्षण कन्नड माध्यमाच्या शाळेत सातवीपर्यंत झाले. 1979 मध्ये ते नोकरीच्या शोधात मुंबईत आले. येथे त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करत असतानाच गोरेगावमधील महापालिकेच्या शाळेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अंधेरीतील सीईएस कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
प्लंबर अप्रेंटिस म्हणून काम करत असताना त्यांचा संपर्क अंमली पदार्थविरोधी विभागातील काही पोलीस अधिकाऱ्यांशी आला. यातूनच त्यांना पोलीस सेवेत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली. अखेर, 1995 मध्ये त्यांनी पोलीस अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यांची जुहू पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
अंडरवर्ल्डविरोधातला संघर्ष आणि ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ची ओळख
त्याच दरम्यान, मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रभाव प्रचंड होता. डिसेंबर 1996 मध्ये दया नायक यांनी जुहू येथे केलेल्या एन्काऊंटरमध्ये छोटा राजनच्या दोन गुंडांचा खात्मा केला. या घटनेनंतरच त्यांची ओळख ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणून झाली आणि अंडरवर्ल्डमध्ये त्यांचे नाव धडकी भरवू लागले.
प्रसिद्धीबरोबरच वादही त्यांच्या वाट्याला आले. 2004 मध्ये त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा आरोप झाला. मोक्का न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) दया नायक यांची बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एसीबीने सहा ठिकाणी छापे टाकले, ज्यात मुंबईतील अंधेरी आणि कर्नाटकातील कारकला येथे त्यांच्या मालकीच्या दोन लक्झरी बसेसचा तपशील समोर आला. या प्रकरणात त्यांना अटकही झाली.
या वादळातून सावरत, 2012 मध्ये त्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम) नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली. मात्र, 2014 मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आजवर त्यांच्या नावे 87 एन्काऊंटरची अधिकृत नोंद आहे.
सध्या दया नायक गुन्हे शाखा-9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असून, निवृत्तीच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांना सहायक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. त्यांचा हा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला असला तरी, मुंबई पोलीस दलातील त्यांच्या योगदानाची दखल आता अखेर घेण्यात आली आहे.


