Daund News : तलाठी नुसता नावालाच ; कार्यालय वारंवार बंद असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ
[ टाकळी व पाटेठाण तलाठी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा ]
Daund News : दौंड, ता. टाकळी व पाटेठाण तलाठी कार्यालयात तलाठी येत नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहे. तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नियमित न येणाऱ्या तलाठी यांना नागरिक वैतागून गेले आहेत. अनेक वेळा तक्रारी करुनही कुठलीही सुधारणा होत नसल्यामुळे तहसीलदार अरुण शेलार यांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी रयत शेतकरी संघटनेने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दौंड तालुक्यातील राहू बेट येथील टाकळी भिभा व पाटेठाण गावची लोकसंख्या बऱ्यापैकी असल्याने प्रशासनाने गावात तलाठी कार्यालय उघडले आहे. येथे कार्यरत असलेले तलाठी कर्तव्य बजावत नसल्यामुळे कामे खोळंबली असून नागरिकही हैराण झाले आहेत. तलाठी कार्यलयाच्या परिसरात तलाठी भाऊसाहेब दिसले का ? अशी शेतकरी विचारणा करताना दिसतात. तलाठी कर्तव्यात कसूर करीत असून कार्यालयात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे दाखले मिळत नाहीत. दिवसभर नागरिक व शेतकरी तलाठी कार्यालयासमोर थांबून येण्याची वाट पाहतात. मात्र, तलाठी माञ, कार्यालयाकडे फिरकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र कायदे सल्लागार अध्यक्ष बबन गायकवाड, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अंकुश हंबीर, दौंड तालुका महिला आघाडी सरचिटणीस माधुरी वडघुले, वंचित बहुजन आघाडीच्या चैतना सोनवणे,
वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष बापू जगताप, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार ममता भंडारी यांना निवेदन देण्यात आले.
राहू गाव येथील सर्व किराणा दुकान दर शनिवारी बंद राहतील असा ठराव घेतलेला आहे. सदरची सर्व किराणा दुकाने बंद असल्याने ज्या मजुरांची हातावरती पोट आहेत त्यांना दुकान बंद असल्याकारणाने प्रपंचात आवश्यक असलेले किराणा साहित्य मिळत नाही. पर्यायाने पिंपळगाव, देवकरवाडी या ठिकाणी जावे लागत आहे. किराणा दुकान हे अत्यावश्यक सेवेत येत असताना जावून बुजून शनिवारी दुकाने बंद ठेवली जातात. तरी शनिवारी दुकाने बंद ठेवून हातावर पोट असणाऱ्या मजूरांना वेठीस धरू नये. अशी सूचना दुकानदार यांना देण्यात यावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार यांना या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनही गावकामगार तलाठी गावात वेळेवर येत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
— बापूसाहेब देशमुख रयत शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष