पुणे

परीक्षा पेपर युट्युबवर प्रसारित केल्याने गुन्हा दाखल

•’कैलासन सर मॅथ्स’, ‘म मराठी’, ‘एस.जे. ट्युशन क्लासेस’ या चॅनेलवर पेपर फुटल्याचा आरोप

पुणे :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 3 री ते 9 वीच्या परीक्षांचे पेपर आणि त्यांची उत्तरे परवानगीशिवाय युट्युब चॅनेलवर प्रसारित केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिषदेच्या सहायक संचालक संगीता शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, ‘कैलासन सर मॅथ्स’, ‘म मराठी’ आणि ‘एस.जे. ट्युशन क्लासेस’ या तीन खासगी युट्युब चॅनेलवर हे पेपर प्रसारित करण्यात आले. यावर्षी 6 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत पायाभूत चाचणी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी परिषदेने 17 ते 31 जुलै दरम्यान कार्गो कंपनीमार्फत शाळांमध्ये पेपर पाठवले होते.

6 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता काही युट्युब चॅनेलवर सातवीच्या मराठी विषयाचा पेपर, तसेच 5 आणि 7 ऑगस्टला होणाऱ्या सातवी आणि आठवीच्या गणिताचे पेपर प्रसारित झाल्याचे समोर आले. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या आणि इतर परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याच्या कायद्यानुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता या युट्युब चॅनेलच्या मालकांवर कारवाईची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0