पुणे

Daund News : ग्रामीण आरोग्य सेवेलाच उपचाराची गरज ; यवत ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा बोजवारा

[ काही मागण्या पूर्ण काही बाकी ; उपोषण तूर्तास स्थगितिची उमेश म्हेत्रेंची घोषणा ]

दौंड, ता.१४ दौंड तालुक्यातील मोठे गाव व प्रमुख बाजारपेठ आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असूनही यवत ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. उपोषणाला सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा निपटारा करावा मागणी, अशी मागणी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
शुक्रवारी दुपारी १ वाजता वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर पत्की व त्यांचे सहकारी, यवत ग्रामपंचायत सरपंच समीर दोरगे आणि यवत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या सकारात्मक चर्चा झाली. त्यांनतर म्हेत्रे यांनी उपोषण तूर्तास स्थगित केल्याची माहिती दिली. अधीक्षक किशोर पत्की, सरपंच समीर दोरगे, व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन उपोषण मागे घेतले.


यावेळी उमेश म्हेत्रे म्हणाले की आम्ही मागणी केलेल्या मुद्यांची पूर्तता होईल असे वैद्यकीय अधीक्षक यांनी लिखित स्वरूपात दिले आहे. तर आणखी काही प्रश्न पूर्ण झाले नाहीत. त्या मागण्याही लवकरच पूर्ण होतील असे सांगितले. मागण्या मान्य नाही झाल्यास पुढचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी म्हेत्रे यांनी दिला.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढते आहे. भीषण अपघातातील रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, यासाठी यवत येथे ट्राॅमा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, यवत रुग्णालयात आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकीकडे कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसून दुसरीकडे वेळेवर डाॅक्टर हजर होत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे तालुक्याचा विकास केला असल्याच्या वल्गना केल्या जात असताना आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.


औद्योगिकीकरणाकडे वाटचाल करणारा दौंड तालुका हा कित्येक पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यामध्ये रस्ते, पाणी, आरोग्य, रोजगार इत्यादी सुविधा यांचा समावेश आहे. अलीकडे शहरीकरण झालेल्या दौंड तालुक्यात एकही आधुनिक सुसज्ज असे रुग्णालय नसल्याने तालुक्यातील नागरिकांना पुण्याकडे उपचार घेण्यासाठी जावे लागते. त्यामध्ये सर्वात जास्त हाल गरिब रुग्नांचे होत आहेत. दौंड तालुक्यात श्रमिक तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना यवत ग्रामीण रुग्णालयाचा मोठा आधार आहे. मात्र, येथील आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर परवड होत आहे. येथील रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध समस्या आ वासून उभ्या आहेत. यवत परिसरातील नागरिकांची लोकसंख्या पाहता अजिबात पुरेसे नाही. रुग्णालयात कोणत्याही अत्याधुनिक प्रकारची आरोग्य सुविधा नसल्याने परिसरातील रुग्णांना थेट पुणे येथील रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. प्रशासनाने आता तरी नागरिकांच्या आरोग्याला प्राथमिकता देत रुग्ण सेवेची जाण ठेवून रुग्णांना विविध आजारांवर उपचार मिळावेत अशी मागणी केली.

[ रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून सफाई कर्मचारी वर्ग अपुरा आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर ही सर्व कामे केली जातात. डायलेसीस युनिटचे काम प्रगतीपथावर आहे, शासनाकडून मशीनची पूर्तता झाली आहे. शासनाने या युनिट साठी लवकर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केल्यास लवकरच कार्यान्वित होईल. रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी खाजगी सोनोग्राफी सेंटरसोबत शासनाचे एम. ओ. यु. करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच गरोदर मातांना खाजगी सोनोग्राफी सेंटरमधून मोफत सुविधा पुढील दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात व बाहेरील बाजूस नातेवाईकांना नळाद्वारे पाणी पुरवठा व बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था पंधरा दिवसात केली जाईल.
— किशोर पत्की वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय यवत ] [ ग्रामीण रुग्णालय यवत परिसरातील नागरिकांना उपचाराकरिता वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शासनाने सुरू केलेल्या ट्राॅमा केअर सेंटरमध्ये सोयी सुविधांचा अभाव असल्याची नेहमीच ओरड होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला प्राथमिकता देत रुग्ण सेवेची जाण ठेवून रुग्णांवर उपचार करावेत.
— उमेश म्हेत्रे सामाजिक कार्यकर्ते उपोषणकर्ते. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0