महाराष्ट्र
Trending

Datta Pawar Suicide News : परभणीत धक्कादायक वळण! संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची जामिनावर सुटताच आत्महत्या

•13 महिन्यांच्या कोठडीनंतर घरी परतला अन् जीवन संपवलं; मिर्झापूर गावातील शेतातील घरात घेतला गळफास

परभणी | परभणी शहरात 10 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता सोपान पवार याने सोमवारी (12 जानेवारी 2026) सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तब्बल 13 महिने कारागृहात घालवल्यानंतर चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. परभणी तालुक्यातील मिर्झापूर येथील स्वतःच्या शेतातील खोलीत त्याने आपली जीवनयात्रा संपवली.

नेमकी पार्श्वभूमी काय होती?

10 डिसेंबर 2024 रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. दत्ता पवारला पोलिसांनी तातडीने अटक केली होती. या घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हिंसाचार झाला होता, ज्यामध्ये विधी शाखेचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत असताना संशयास्पद मृत्यू झाला होता. या दोन घटनांमुळे परभणीचे वातावरण कित्येक महिने स्फोटक राहिले होते.

जामिनावर सुटताच टोकाचे पाऊल
दत्ता पवार हा गेल्या 13 महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात होता. जामिनासाठी कुणीही नातेवाईक पुढे न आल्याने अखेर मोफत विधी सेवा अंतर्गत त्याला 8 जानेवारी 2026 रोजी वैयक्तिक बाँडवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. जामिनावर सुटल्यानंतर तो मिर्झापूर येथील आपल्या शेतात वास्तव्यास होता. मात्र, सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास त्याने गळफास घेतल्याचे समोर आले.

मानसिक तणावाचा अंदाज

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दत्ता पवार हा मानसिक आजाराने ग्रस्त होता आणि कारागृहात असतानाही त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. त्याचे कुटुंबीय पुण्यात राहत असून तो मिर्झापूर येथे एकटाच होता. कौटुंबिक दुरावा, 13 महिन्यांची कोठडी आणि मानसिक तणाव यातून त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तणावपूर्ण शांतता

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा परभणीत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून, पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0