Dadar Kabutar khana News : दादर कबुतरखाना प्रकरण तापले; मराठी एकीकरण समितीचे आंदोलन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

•जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद, परिसरातील दुकाने दुपारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
मुंबई :- दादर कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज (13 ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली असून, परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला प्रत्युत्तर देण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तरीही समितीने मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप केला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतरखाना परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 150 मुंबई पोलीस तसेच राज्य राखीव दलाची कुमक परिसरात असून, शिवाजी पार्क, दादर, शाहू नगर, धारावी, माहिम, कुर्ला आणि व्ही.बी. नगर पोलिस ठाण्यांचे अधिकारी तैनात आहेत. दादर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला असून, परिसरातील दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कबुतरखाना बंदीच्या मागणीवरून जैन आणि मराठी एकीकरण समिती यांच्यात तणाव वाढला आहे. 6 ऑगस्ट रोजी जैन व मारवाडी समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांवर धक्काबुक्की व मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप समितीने केला आहे. “मराठी माणसांनी शांत बसायचे का?” असा सवाल समितीचे नेते गोवर्धन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, कबुतरखाना प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. कबुतरखान्यांमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचा विचार कोर्टाने व्यक्त केला असून, त्यासंदर्भात आज घोषणा होण्याची शक्यता आहे. बंदी कायम असल्याने न्यायालयाच्या पुढील आदेशांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



