Cyber Police : सायबर पोलिसांचा ‘जादूचा हात’! – फसवणूक झालेली संपूर्ण 2.30 लाखांची रक्कम तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर तक्रारदाराला परत

Mira Bhayandar Cyber Crime News : व्हाट्सएपद्वारे ‘APK File’ पाठवून केलेली फसवणूक उघड; अनोळखी खाती गोठवली; न्यायालयीन प्रक्रियेनंतर मीरा-भाईंदर पोलिसांचे मोठे यश
मीरा-भाईंदर :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने एका ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्याचा यशस्वीरित्या छडा लावून, फसवणूक झालेली संपूर्ण 2 लाख 30 हजार रुपये रक्कम तक्रारदाराच्या मूळ बँक खात्यात परत मिळवून दिली आहे. सायबर गुन्हेगारांच्या खात्यातून रक्कम काढून घेण्याचे हे एक महत्त्वाचे यश मानले जात आहे.
थरारक फसवणुकीची घटना
मीरा रोड येथील रहिवासी मोहमद खान यांना अनोळखी व्यक्तीने मित्राच्या नावाने व्हाट्सएपवर संपर्क साधला. तातडीने पैसे पाठवण्याचे निमित्त सांगून त्याने एक ‘APK File’ लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले. खान यांनी त्या लिंकवर क्लिक करताच, त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2.30 लाख रुपये कपात झाले आणि त्यांची फसवणूक झाली.
पोलिसांचा यशस्वी पाठपुरावा
तक्रार मिळताच सायबर पोलीस ठाण्याने तात्काळ NCCRP पोर्टलवर तक्रार नोंदवली. फसवणुकीची रक्कम ज्या सहा बँक खात्यांमध्ये वर्ग झाली होती, ती खाती शोधून पोलिसांनी तात्काळ ती गोठवण्याची (Freeze) कारवाई केली.
तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर आणि बँकांशी सातत्याने पत्रव्यवहार करून, तसेच न्यायालयात अहवाल सादर करून न्यायालयाचे आदेश मिळवले. सायबर पोलिसांनी यशस्वी पाठपुरावा करत तक्रारदाराची संपूर्ण 2.30 लाख ही रक्कम त्यांच्या खात्यात परत जमा केली आणि त्यांना प्रतिकात्मक चेक देऊन माहिती दिली.



