Dombivli Crime News : ऑस्ट्रेलियात नोकरीचे आमिष… निवृत्त वृद्धाची 20 लाखांची फसवणूक

•Dombivli Job Scam नऊ वर्षे दिलासा देत ठेवली आशा; शेवटी वृद्धाचा संयम सुटला
डोंबिवली | तुमच्या मुलाला ऑस्ट्रेलियात हाय-सॅलरी जॉब लावतो…” अशा गोडगोड आश्वासनांनी डोंबिवलीतील 74 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी हे तक्रारदारांच्या परिचयातीलच असल्याची माहिती समोर आली आहे.
सोमनाथ विसपुते असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव असून, त्यांनी आपल्या मुलाला परदेशात नोकरी मिळेल या आशेने सन 2017 ते 2025 या कालावधीत इरफान पारकर, त्याची पत्नी आणि लियाकत पारकर या तिघांना हप्त्यांमध्ये 20 लाख रुपये दिले. “ह्युमन रिसर्च” नावाच्या कंपनीत नोकरी लावतो, पासपोर्टही आम्ही करून देतो, अशी ग्वाही देत या तिघांनी विश्वास संपादन केला.
शेवटी अनेक वेळा विचारणा करूनही नोकरी तर सोडाच, मुलाचा पासपोर्टही मिळाला नाही. सुरुवातीला वेळकाढूपणा आणि नंतर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विसपुते यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सध्या डोंबिवली परिसरात तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.


