महाराष्ट्र

CP Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल आता भारताचे उपराष्ट्रपती! एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचा एकतर्फी विजय

• Vice President CP Radhakrishnan : पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांकडून अभिनंदन; पराभवानंतरही लोकशाहीवर विश्वास, रेड्डी यांची प्रतिक्रिया

ANI :- भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. आज पार पडलेल्या मतदानात त्यांना तब्बल 452 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे भारतीय राजकारणात एनडीएची पकड आणखी मजबूत झाली आहे.

विक्रमी मतदानासह निकाल जाहीर

काल सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संसद भवनात मतदान पार पडले. एकूण 781 सदस्यांपैकी 98 टक्के मतदान झाले, जे एक विक्रमी आकडेवारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी मतदान केले. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत एनडीएचे संख्याबळ निर्विवाद होते, मात्र विजयासाठी 391 मतांची आवश्यकता होती. ती संख्या सहज पार करत राधाकृष्णन यांनी 452 मते मिळवली. दुसरीकडे, इंडिया आघाडीला बीआरएस आणि बिजू जनता दलाच्या खासदारांनी मतदानात भाग न घेतल्याने मोठा धक्का बसला.

नेत्यांकडून अभिनंदन आणि प्रतिक्रिया

विजय निश्चित झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगेचच ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, “तळागाळातून वर आलेल्या एका नेत्याचे सखोल ज्ञान संसदीय लोकशाहीला अधिक बळकट करेल.”

विजयी उमेदवार राधाकृष्णन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. “त्यांचे जीवन नेहमीच समाजसेवा आणि गरीब-वंचितांना समर्पित राहिले आहे,” असे मोदी म्हणाले.

पराभवानंतरही सुदर्शन रेड्डी यांनी नम्रपणे निकाल स्वीकारला. “लोकशाही प्रक्रियेवर माझा अढळ विश्वास आहे. नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींना मी शुभेच्छा देतो,” असे ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निवडणुकीला ‘विचारधारेची लढाई’ म्हटले असून, नवनिर्वाचित उपराष्ट्रपती संसदीय परंपरांचे पालन करतील अशी आशा व्यक्त केली आहे.

vivek

Recent Posts