Pune News : मारणे टोळीकडून केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला

•छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मिरवणुकीत दुचाकी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभियंत्याला बेदम मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या (19 फेब्रुवारी) जयंतीनिमित्त कोथरूड भागातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत एका दुचाकीस्वारांने मिरवणुकीतून गाडी काढण्याचा प्रयत्न करत असताना मारणे टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत अभियंता मोठ्या प्रमाणावर जखमी झाला आहे. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय 33, रा. कोथरूड) असे जखमी झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जोग यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरातून बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एका मंडळाकडून श्री शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. संगणक अभियंता जोग यांना सुटी असल्याने ते दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून खरेदीसाठी बाहेर पडले.
खरेदी करून घरी जात असताना समोरून मिरवणूक येत होती. दुचाकीवरून वाट काढणाऱ्या जोग यांना तिघांनी अडविले. दुचाकी नीट चालविता येत नाही का, अशी विचारणा करून तिघांनी जोग यांना बेदम मारहाण केली. नाकावर ठोसा बसल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वडिलांना दिली. जखमी अवस्थेतील जोग यांनी कोथरुड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.