Corona News Update : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; एका दिवसात 105 नवे रुग्ण

मुंबई-पुण्यात सर्वाधिक रुग्ण; राज्यभरातील सक्रिय रुग्णसंख्या 526 वर 17 जणांचा मृत्यू; बहुतांश रुग्णांना सह-रुग्णता होती
मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, गुरुवारी (5 जून) एकाच दिवशी 105 नवीन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 32, तर पुणे महापालिका हद्दीत 33 रुग्णांची नोंद झाली आहे.
याशिवाय ठाणे महापालिका हद्दीत 14, नवी मुंबईत 9, साताऱ्यात 5, पुणे ग्रामीणमध्ये 4, पिंपरी-चिंचवडमध्ये 4, ठाणे ग्रामीण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व नागपूर महापालिकांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 526 वर पोहोचली आहे. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत 1064 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी 521 जणांनी कोरोवर मात केली आहे.
राज्यात जानेवारीपासून आजपर्यंत एकूण 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यात 16 जण गंभीर आजारांनी ग्रस्त होते. एका रुग्णाला COPD, क्रॉनिक ब्राँकायटिस आणि हृदयविकाराचा त्रास होता. बहुतांश मृतांमध्ये सह-रुग्णता असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
तसेच, आतापर्यंत एकूण 13,707 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. सुदैवाने, बहुतेक सक्रिय रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य स्वरूपाचीच आहेत, असेही सांगण्यात आले आहे.


