Varsha Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाच्या गेटवर काँग्रेसचे आंदोलन
•वर्षा गायकवाड, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन
मुंबई :- खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन करण्यात आले होते. काँग्रेसने मंत्रालयाच्या परिसरात बदलापूर मधील झालेल्या घटनेच्या दिशेधार्थ खासदार वर्ष गायकवाड आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनापूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत 24 ऑगस्टला राज्य बंदची हाक देण्यात आली आहे. बलात्कारा प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करून त्याला फाशी देण्याची मागणी ही या आंदोलनात करण्यात आली आहे. परंतु पोलिसांनी मंत्रालयात शिरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आहे.आता शाळेतही मुली सुरक्षित नाहीत, शिंदे सरकार काय करतेय? असा संतप्त सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
बदलापूर येथील 2 अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदे नामक आरोपीला न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे काल मंगळवारी बदलापुरात तीव्र आंदोलन झाले होते. आंदोलकांनी दिवसभर रेल्वे रोको केला होता. त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला होता. अखेर पोलिसांनी लाठीमार करून या आंदोलकांना हुसकावून लावले होते. तत्पूर्वी, दिवसभरात दोनवेळा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.
बदलापूर प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ज्या शैक्षणिक संस्थेशी हे प्रकरण आहे ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि त्याच पक्षाच्या वकिलाची, ज्यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूकही लढवली आहे, त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या हे प्रकरण दडपले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.