Congress MP Gaurav Gogoi : ‘नेहरू फोबिया’ की ‘इतिहास लेखन’? – ‘वंदे मातरम’ चर्चेत काँग्रेस खासदार गौरव गोगोईंचा मोदींना आकडेवारीसह लोकसभेत थेट आव्हान!

Congress MP Gaurav Gogoi On PM Modi :”मोदींच्या भाषणाचे दोन उद्देश: इतिहास पु्न्हा लिहिणे आणि चर्चेला राजकीय रंग देणे.” – मागील भाषणांमध्ये मोदींनी नेहरूंचा किती वेळा उल्लेख केला, याची आकडेवारीच वाचून दाखवली; ‘लाखो प्रयत्न करूनही नेहरूंच्या योगदानावर काळा डाग लावणे शक्य नाही’
ANI :- ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी आकडेवारीसह जबरदस्त प्रत्युत्तर दिले.
गोगोई यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींच्या पूर्ण एक तासाच्या भाषणाचे विश्लेषण केले आणि त्यांचे दोन मुख्य उद्देश असल्याचा थेट आरोप केला. पहिला उद्देश म्हणजे, त्यांचे बोलणे ऐकून असे वाटत होते की त्यांचे राजकीय पूर्वज स्वत: ब्रिटिशांविरुद्ध लढत होते आणि स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते, म्हणजेच इतिहास पुन्हा लिहिण्याची त्यांची इच्छा आहे. तर दुसरा उद्देश, या संपूर्ण ‘वंदे मातरम’ वरील चर्चेला राजकीय रंग देणे हा होता.
नेहरूंच्या उल्लेखाचे ‘रेकॉर्ड’ वाचून दाखवले
पंतप्रधान मोदींच्या ‘नेहरू फोबिया’वर हल्लाबोल करताना गोगोई यांनी मागील संसदेतील चर्चांमधील आकडेवारीच वाचून दाखवली. ते म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत मोदींनी 14 वेळा पंडित नेहरूंचे आणि 50 वेळा काँग्रेसचे नाव घेतले. तसेच, संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनावेळी 10 वेळा नेहरू आणि 26 वेळा काँग्रेसचे नाव घेतले. याशिवाय 2022 मध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी 15 वेळा, तर 2020 मध्ये 20 वेळा पंडित नेहरूंचे नाव घेतले होते.
वंदे मातरमवरील आरोपांवर सडेतोड उत्तर
वंदे मातरमवरील आरोपांना उत्तर देताना गोगोई आक्रमक झाले. ते म्हणाले, “मी नम्रतापूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला सांगू इच्छितो की, तुम्ही लाखो प्रयत्न केले तरी तुम्ही पंडित नेहरूंच्या योगदानावर एकही काळा डाग लावण्यात यशस्वी होणार नाहीत.”त्यांनी 1937 च्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या ऐतिहासिक निर्णयाची आठवण करून दिली. मुस्लिम लीगने बहिष्कार करण्याची मागणी केली असतानाही, काँग्रेसचे नेते मौलाना आझाद यांनी कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले होते आणि राष्ट्रीय संमेलनामध्ये ‘वंदे मातरम’च्या पहिल्या दोन ओळी गाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. “काँग्रेस पक्ष कोण्या हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीगनुसार चालणार नाही, तो भारताचे लोक आणि वंदे मातरमच्या मूळ भावानुसार चालेल,” असे ठाम विधान गोगोई यांनी केले.



