CM Eknath Shinde : ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’चा मान महाराष्ट्राला मिळाला, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले- ‘शेतकऱ्याचा मुलगा म्हणून…’
•Maharashtra Got the Honour Of Best Agricultural State Award ॲग्रीकल्चर टुडे ग्रुपकडून महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळाला. शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते सीएम शिंदे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
मुंबई :- महाराष्ट्राला मिळाला ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’चा मान मिळाला आहे.ॲग्रिकल्चर टुडे ग्रुपतर्फे महाराष्ट्राला बुधवारी 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या वतीने हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे.”
पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवल्याबद्दल महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार राज्यातील शेतकऱ्यांना समर्पित करत असल्याचे यावेळी सांगितले. त्यांच्या घामामुळे आणि श्रमामुळे हा पुरस्कार एका शेतकरीपुत्राला स्वीकारण्याचे भाग्य मिळाले आहे. या पुरस्कारासाठी राज्याची निवड केल्याबद्दल सर्व परीक्षक आणि निवडकर्त्यांचे आवर्जून आभार मानले.
राज्याने 21 लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. राज्य शासनाने बांबू लागवडीसाठी प्राधान्य दिले असून 7 लाखांची सबसिडी दिली आहे. पीएम किसान निधी दुप्पट करून प्रत्येक शेतकऱ्याला 12 हजार रुपये दिलेत. लातूर येथे देशातील पहिला मायक्रो मिलेट प्रकल्प उभारला जात आहे. एक रुपयात पीकविमा, 123 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे 17 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपावरील वीज बिल माफ करून मोठा दिलासा दिला असून शेतकरी हितासाठी यापुढेही कटिबद्ध राहू अशी ग्वाही यासमयी दिली.
माजी मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आलेला हा सन्मान हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल घेतो.यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ.एम.जे.खान, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.